मुंबई : दापोली येथील साई रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशाविरोधात रिसॉर्टच्या मालकाने उच्च न्यायालयात धाव घेतली असून कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली. रिसॉर्टच्या मालकाला तातडीचा दिलासा देण्यास नकार देताना याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचे न्यायालयाने मान्य केले. त्यानुसार याप्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे.

शिवसेना नेते अनिल परब यांच्या मालकीचा हा रिसॉर्ट असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच हा रिसॉर्ट पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आला असून त्याविरोधात कारवाईची मागणी सोमय्या यांनी केली होती. पर्यावरण मंत्रालयाने गेल्याच महिन्यात हा रिसॉर्ट का पाडण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी ‘कारणे दाखवा’ नोटीस रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांना बजावली होती. या नोटिशीविरोधात कदम यांनी वकील साकेत मोने यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली. अनिल परब यांच्यासोबतच्या राजकीय वैरामुळे आपल्याला या कारवाईत अडकवले जात आहे. त्यातूनच ही कारवाईची नोटीस पाठवण्यात आल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला आहे.

मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी ही याचिका सुनावणीसाठी आली. त्यावेळी आपल्याला कोणतीही वैयक्तिक सुनावणी न देताच रिसॉर्टच्या पाडकाम कारवाईचे आदेश देण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आला. तसेच पाडकाम कारवाईला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली.  न्यायालयाने याचिकाकर्त्यांला तातडीचा अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. मात्र त्याच वेळी याचिकेवर सोमवारी सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले.