महापालिका प्रशासनाचा निर्णय; चेंबूर, महालक्ष्मी भागांत मोठय़ा प्रकल्पांची उभारणी

प्रसाद रावकर
मुंबई : मुंबईच्या हिश्शाच्या प्राणवायूची वाटमारी आणि त्यानंतर वैद्यकीय प्राणवायूचा निर्माण झालेला तुटवडा याची गंभीर दखल घेऊन भविष्यात शहरातच सिलिंडरमध्ये प्राणवायू भरण्याची सुविधा उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी लवकरच महालक्ष्मी आणि चेंबूर येथे मोठे प्रकल्प उभारण्यात येणार असून निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदारांना कार्यादेशही देण्यात आले आहेत.

मुंबईत करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. करोनाची दुसरी लाट सुरू होताच मोठय़ा संख्येने रुग्णांना प्राणवायूची गरज भासू लागली होती. काही रुग्णालयांमधील प्राणवायूचा साठा संपुष्टात येऊ लागल्याने रुग्णांना अन्य रुग्णालयांमध्ये हलविण्याची नामुष्की ओढवली होती. त्यानंतर मुंबईच्या हिश्शाच्या प्राणवायूच्या साठय़ाचा अभ्यास करण्यात आला. मुंबईच्या हिश्शाचा प्राणवायू नवी मुंबईतील भरणा केंद्रावरून आणावा लागत होता. ठाणे आणि नवी मुंबईतील संबंधित यंत्रणांनी मुंबईच्या हिश्शाचा प्राणवायू परस्पर आपल्या शहरांकडे वळविण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला होता. त्यावरून प्रचंड गोंधळही उडाला होता. अखेर मुंबई महापालिकेने अधिकारी आणि सुरक्षारक्षकांना तैनात करून शहरासाठी मिळणारा प्राणवायू सुरक्षितपणे आणण्यात येऊ लागला होता. मात्र आता प्रशासनाने नवी मुंबईऐवजी मुंबईतच प्राणवायू भरणा केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महालक्ष्मी रेसकोर्स आणि चेंबूर येथील बीपीसीएलची निवडही केली आहे.

महालक्ष्मी रेसकोर्सवर प्रतिदिन २६ मेट्रिक टन क्षमतेचे डय़ुरा सिलिंडर भरणा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पात दररोज सुमारे १०० डय़ुरा सिलिंडरमध्ये प्राणवायू भरण्यात येणार आहे. चेंबूर येथील बीपीसीएलमध्ये पाच ते १० मेट्रिक टन क्षमतेचे प्राणवायू भरणा केंद्र उभारण्यात येणार असून या प्रकल्पात जम्बो सिलिंडरमध्ये प्राणवायू भरण्यात येणार आहे. या केंद्रात दर दिवशी सुमारे एक हजार ५०० जम्बो सिलिंडरमध्ये प्राणवायू भरण्याची क्षमता आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये प्राणवायू भरून सिलिंडर विविध रुग्णालयांना पाठविण्यात येणार आहेत.

दरम्यान, नऊ रुग्णालयांमध्ये १६ प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यासाठी ८३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या प्रकल्पांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मात्र काही प्रकल्पांना विलंब होत असल्यामुळे पालिकेने संबंधित कंत्राटदारांवर नोटीसही बजावली आहे.

महालक्ष्मी आणि चेंबूर येथे सिलिंडरमध्ये वैद्यकीय प्राणवायू भरण्याचे दोन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. अन्य शहरांकडून मुंबईच्या वाटय़ाचा प्राणवायू पळविण्यात येऊ नये म्हणून हे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यामुळे भविष्यात प्राणवायू तुटवडय़ाची समस्या उद्भवणार नाही.

– पी. वेलरासू, अतिरिक्त पालिका आयुक्त