मुंबई : गेल्या वर्षी करोनामुळे होऊ न शकलेल्या पु. ल. कला महोत्सवाला यंदा मात्र मोठय़ा जल्लोषात सुरुवात झाली असून सूरतालाच्या मैफली, लोककलांचा जागर, नृत्याचा नजराणा, नाटक, कविता अशा रंजनात्मक वातावरणाने रवींद्र नाटय़ मंदिर संकुलातील वातावरण चैतन्यमय झाले आहे.

ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांस्कृतिक कार्य विभाग, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे दरवर्षी पु. ल. कला महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा ८ नोव्हेंबर रोजी या महोत्सवाला सुरुवात झाली असून १४ नोव्हेंबपर्यंत विविध कार्यक्रमांनी महोत्सव रंगत येणार आहे. कोल्हापूरच्या ऋषिकेश देशमाने यांच्या ‘ताल उत्सव’ या कार्यक्रमाने सोमवारी महोत्सवाला सुरुवात झाली.

 देशमाने यांनी महाराष्ट्राच्या लोकवाद्यांचे सादरीकरण करत पुलंना वाद्यांजली वाहिली. यावेळी सांस्कृतिक विभागाचे सचिव सौरभ विजय, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभिषण चवरे उपस्थित होते. यानंतर ‘लोकरंग’ या कार्यक्रमातून नंदेश उमप यांनी लोककलांचा, तर शुभा जोशी यांनी देशभक्तीपर गीतांचा आविष्कार सादर केला.

‘करोनापश्चात लहान मुलांचे मानसिक आरोग्य’ यावर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप जाधव यांनी मंगळवारी उपस्थितांशी संवाद साधला. तर ‘करपल्लवी गोंधळ’ सादर करत वाईच्या राजेंद्र कांबळी आणि अमित शिंदे यांनी लोककलेचा बाज सादर केला. तर ‘लावण्य दरबार’ कार्यक्रमाने महोत्सवात रंगत आणली. मेघा घाडगे, आकांक्षा कदम, कविता घडशी आणि सहकाऱ्यांनी लावण्या सादर केल्या. सर्व कार्यक्रम प्रचंड प्रतिसादात पार पडले. बुधवारी ‘अनवट शांताबाई’ या कार्यक्रमातून डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांनी ज्येष्ठ साहित्यिका शांता शेळके यांच्या कवितांचे आणि ललित गद्यांचे सादरीकरण केले. शुभदा धनु यांनी ‘मोबाइल मुक्ती’ या कार्यक्रमातून लहान मुलांसाठीचे नवे खेळ दाखवले. ‘जागर अनामवीरांचा’ या कार्यक्रमातून क्रांतिकारकांच्या कार्यला उजाळा देण्यात आला. गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या मैफलीने महोत्सवात रंगत आणली. याशिवाय चंद्रपूर, नाशिक, पुणे, संभाजी नगर अन्य ग्रामीण भागातील कलावंतही आपली कला सादर करणार आहेत.

आगामी कार्यक्रम

  • ११ नोव्हेंबर: ‘नृत्यधारा’, ‘वसंत बहार’(संगीत) , ‘दास्ता ए बडी बांका’ (प्रायोगिक), ‘मरते रे मैना झुरते रे राघू (झाडीपट्टी)’
  • १२ नोव्हेंबर: ‘अपरिचित पु. ल.’, ‘जागर महिला लोक कलेचा’, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’
  • १३ नोव्हेंबर : ‘जावे पुलंच्या गावा’, ‘संगीतसूर्य दर्शन’, ‘आदिवासी नृत्य व गायन’, ‘आम्ही दुनियेचे राजे’
  • १४ नोव्हेंबर: ‘कविसंमेलन’, ‘भक्ती महोत्सव’, ‘अभंग रिपोस्ट’, ‘सांगता समारंभ’, ‘संगीत संत तुकाराम’