मुंबई : पालिकेची पूर्वपरवानगी न घेताच गिरगाव परिसरातील पुरातन वारसा वास्तूचा दर्जा लाभलेल्या खोताच्या वाडीतील एका बंगल्याचे पाडकाम करण्यात येत असल्याची बाब स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पालिकेच्या डी विभाग कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून गुरुवारी संबंधितांवर तात्काळ काम बंद करण्याची नोटीस बजावली.
ब्रिटिश काळात बांधण्यात आलेले टुमदार बंगले, छोटय़ा-छोटय़ा गल्ल्या आणि ठिकठिकाणी पुरातन वारसा वास्तूंचे दर्शन घडविणाऱ्या गिरगावमधील खोताच्या वाडीतील आयडियल वेफर्स हाऊसजवळील फर्नाडिस हाऊस, बंगला क्रमांक २८ चे पाडकाम सुरू असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी बुधवारी रात्री पालिका अधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन गुरुवारी सकाळीच डी विभाग कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या एक मजली बंगल्याची पाहणी केली. त्यानंतर तात्काळ पालिकेने बंगल्याचे मालक आणि कब्जेदारांवर काम बंद करण्याची नोटीस बजावली.
बंगल्याच्या पाडकामासाठी संबंधित यंत्रणांची परवानगी घेतल्याची कागदपत्रे २४ तासांमध्ये सादर करण्याचे आदेश नोटिशीमध्ये देण्यात आले आहेत. बंगल्याच्या पाडकामासाठी आवश्यक साहित्य, यंत्रसामग्री आदींचा वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ते तात्काळ तेथून हटवावे. अन्यथा हे सर्व साहित्य तेथून हटविण्यात येईल आणि त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असा इशाराही या नोटिशीत देण्यात आला आहे.
बंगल्याचे पाडकाम सुरू असल्याबाबत तक्रार प्राप्त होताच संबंधित अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी केली. या संदर्भात संबंधितांना नोटीस बजावण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात येईल, असे डी विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.