मुंबई :  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आणि पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील वाळवंडा येथील अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या भिकल्या लाडक्या धिंडा यांना ‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर झाला. त्यांच्या तारपा वाद्याचे स्वर समाज माध्यमांसह वृत्तवाहिन्यांवर घुमू लागले तेव्हा अनेक श्रोत्यांनी त्यांना ‘शेअर’ चे बटण दाबून दाद दिली. तारपा या आदिवासी वाद्याची परंपराही तितकीच रोचक आहे.

आयुष्यभर मेहनत करून निसर्गातच आयुष्य जगलेल्या आणि आता ९२ वय असणाऱ्या भिकल्या धिंडा यांचा ‘पद्मश्री’ ने सन्मान झाला आणि खऱ्या अर्थाने मातीतील कलाकारचा सन्मान झाल्याची भावना व्यक्त होऊ लागली. पालघर हा आदिवासी जिल्हा. जव्हार, मोखाडा, वाडा, पालघर आणि डहाणू हे प्रामुख्याने आदिवासी वस्तीचे आणि संस्कृतीचे समृद्ध भाग. भिकल्या धिंडा यांचा जन्मही आदिवासी कुटुंबातील. वयाच्या बाराव्या वर्षांपासून त्यांनी तारपा वाजवायला सुरुवात केली. त्यांच्या घरात मागील १५० वर्षांपासून तारपा वादनाची परंपरा आहे. त्यांचे वडीलही तारपा वादक होते. त्यांना पाहतच त्यांनी ही कला आत्मसात केली. आजही अगदी नव्वदीतही ते न थकता तारपा वादनाचा आनंद घेताना दिसतात. 

तारपा वाद्य काय आहे ?

आदिवासी संस्कृतीत तारपा हे देवाचे वाद्य मानले जाते. बांबू, माडाची पाती, मेण, सुकलेला दुधी आणि जिबल्या यांच्या साहाय्याने हे वाद्य तयार केले जाते. ते वाजविणाऱ्या व्यक्तीला ‘तारपकर’ असेही म्हटले जाते. देवकार्याला मुख्यत्वेकरून तारपा वादन करण्याची परंपरा आदिवासी समाजात आहे. यालाच ‘चाळा’ वाजविणे म्हणजे विविध आदिवासी देवतांच्या नावे करण्यात येणारे स्तवन किंवा स्तुती. तारपा वादनाद्वारे देवाचे आवाहन करण्यात येते आणि पीक चांगल येऊ दे, आमचे रक्षण कर, आम्हाला सुखी ठेव असे गाऱ्हाणे देवाला या तारपा वादनातून घातले जाते. वारली चित्रांमध्येही तारपा वाद्य वाजविणारे वादक आणि त्याभोवती फेर धरून नाचणारे आदिवासी बांधव दिसतात.

‘या वाद्यात श्वास भरला की वाद्य आणि मी एकरूप होतो, असे भिकल्या धिंडा आपल्या तारपा वादनाविषयी सांगतात. लाल विटांच्या त्यांच्या घरात विविध आकाराची आणि रंगांची तारपा वाद्ये दिसतात. तारपा वाजविणे ही केवळ कला नाही तर ती फार मोठी जबाबदारी आहे असेही धिंडा मानतात. त्यांना जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्कारामुळे त्यांच्या आदीवासी समाजासह पालघर जिल्ह्यातही आनंद व्यक्त केला जात आहे. यामुळे तारपा कलेचाही सन्मान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.