मुंबई : सौरऊर्जा, नॅनोइलेक्ट्रॉनिक्स आणि फोटोव्होल्टाइक तंत्रज्ञान या क्षेत्रांतील संशोधनासाठी ओळखले जाणारे आयआयटी मुंबईचे प्राध्यापक ज्येष्ठ अभ्यासक प्रा. जुझर एम. वासी यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे.

प्रा. जुझर एम. वासी यांनी १९६९ मध्ये आयआटी मुंबईतून येथून बी.टेक. पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९७३ मध्ये अमेरिकेतील द जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) विषयात पीएच.डी. पदवी मिळवली. संशोधन क्षेत्रात त्यांचे कार्य प्रामुख्याने सौरऊर्जा मॉड्यूल्सची विश्वसनीयता, भारतातील सौर फोटोव्होल्टाइक प्रकल्पांची अंमलबजावणी, जागतिक पातळीवरील सौर फोटोव्होल्टाइक तंत्रज्ञानाचा प्रसार, नॅनोक्रिस्टल-आधारित सौर सेल्स आणि नॅनोइलेक्ट्रॉनिक्स या विषयांवर केंद्रित राहिले आहे.

१९७४ ते १९८१ या काळात आयआयटी दिल्लीमध्ये लेक्चरर व सहाय्यक प्राध्यापक, तसेच १९७३ ते १९७४ दरम्यान अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात व्हिजिटिंग असिस्टंट प्रोफेसर म्हणूनही अध्यापनाचा अनुभव घेतला. १९८१ पासून वासी हे आयआयटी मुंबईमध्ये अध्यापन व संशोधन कार्य करत आहेत. १९८३ ते २०१५ या कालावधीत त्यांनी प्राध्यापक म्हणून सेवा बजावली, तर १९९२ ते १९९४ दरम्यान इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळली. २००६ ते २००९ या काळात आयआयटी मुंबईचे उपसंचालक म्हणून त्यांनी प्रशासकीय भूमिका पार पाडली.

२०१५ ते २०१७ या कालावधीत त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात एमेरिटस फेलो म्हणून काम केले, तर २०१७ पासून ते आजपर्यंत आयआयटी मुंबईमध्ये प्राध्यापक एमेरिटस म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक गुणवत्ता, दीर्घ अध्यापन कारकीर्द आणि सौरऊर्जेसारख्या भविष्याभिमुख क्षेत्रातील संशोधनामुळे संबंधित प्राध्यापकांचे योगदान भारतीय अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते.