मुंबई : इंडियन नॅशनल अकॅडमी चे उपाध्यक्ष (INSA) पद्मश्री प्राध्यापक गणपती यादव यांची कॅनेडियन अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग (Canadian Academy of Engineering) अकॅडमीचे फेलो म्हणून निवड झाली आहे. या सन्मानामुळे ते या अकॅडमीच्या इतिहासात हा बहुमान प्राप्त करणारे पहिले भारतीय ठरले आहेत.

नागपूरच्या लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या (LITU ) बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष तसेच एस एन बॉस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सच्या गव्हर्निंग बॉडीचे अध्यक्ष आणि मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) चे संस्थापक कुलगुरू असलेले प्रा. गणपती यादव यांचा औपचारिक सत्कार १ जून २०२६ रोजी कॅनडातील एडमंटन येथे होणार आहे.

या निवडीबद्दल बोलताना प्रा. यादव यांनी “हा सन्मान माझी मातृसंस्था ICT, माझे अत्यंत गुणवान विद्यार्थी आणि माझ्या संपूर्ण प्रवासात मला साथ देणाऱ्या कुटुंबीयांचा असल्याचे सांगितले. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रा. यादव यांना आतापर्यंत १५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान आणि फेलोशिप्स प्राप्त झाले आहेत. नुकतीच त्यांची Danckwerts Memorial Lecture या प्रतिष्ठित व्याख्यानासाठी निवड झाली असून हे व्याख्यान Institution of Chemical Engineers, American Chemical Society आणि Elsevier यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले जाते. तसेच University of Calcutta यांनी त्यांना प्रतिष्ठेचा Acharya P. C. Ray Gold Medal प्रदान केला आहे.

हरित हायड्रोजन, डीकार्बोनायझेशन, शाश्वत विमान इंधन (SAF), कार्बन डायऑक्साइडचे मूल्यवर्धित इंधन व रसायनांमध्ये रूपांतर तसेच कचरा जैवभाराचे मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये रूपांतर या क्षेत्रांतील त्यांच्या अग्रगण्य संशोधन कार्यासाठी प्रा. यादव यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. ते सध्या Ministry of Petroleum and Natural Gas च्या हायड्रोकार्बन समितीचे अध्यक्ष असून Ministry of Road Transport and Highways आणि Ministry of New and Renewable Energy यांच्या हायड्रोजन इन्फ्रास्ट्रक्चर समित्यांवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ११७ पीएच.डी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून ५७६ संशोधन निबंध प्रकाशित केले आहेत आणि त्यांच्या नावावर १३९ पेटंट्स आहेत.