मुंबई : सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिध्द निर्माता पहलाज निहलानी यांचे गुरुवारी निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. गेले काही दिवस प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना घरी आणण्यात आले होते, मात्र गुरूवारी सकाळी ९.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी दुपारी ३.३० च्या सुमारास सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी एका निवेदनाद्वारे दिली.
ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील ‘आँखे’, ‘शोला और शबनम’, ‘अंदाज’ अशा काही लोकप्रिय चित्रपटांचे निर्माते म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, २०१५ मध्ये ‘सेन्सॉर बोर्डा’चे अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांची कारकीर्द अधिक वादग्रस्त ठरली.पहलाज निहलानी यांनी १९८२ मध्ये ‘हथकडी’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यानंतर त्यांनी लागोपाठ ‘आँधी-तूफान’, ‘इल्जाम’ अशा चित्रपटांची निर्मिती केली. धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, शशी कपूर, सनी देओल यांना घेऊन त्यांनी बहुकलाकार असलेल्या चित्रपटांची निर्मिती केली होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील काही नावाजलेल्या निर्मात्यांपैकी निहलानी एक होते. अभिनेता गोविंदा आणि चंकी पाडे यांना आपल्या चित्रपटातून पदार्पणाची संधीही निहलानी यांनी दिली होती.
या दोघांना घेऊन केलेला ‘आँखे’ आणि गोविंदा-दिव्या भारती जोडीचा ‘शोला और शबनम’ हे त्यांचे दोन्ही चित्रपट त्याकाळी यशस्वी ठरले होते. २०१२ मध्ये पुन्हा एकदा गोविंदाला मुख्य भूमिकेत घेऊन केलेल्या ‘अवतार’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही निहलानी यांनी केले होते. जवळपास तीन दशके त्यांनी ‘असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्रॅम प्रोड्युसर्स’ या संस्थेचे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली होती. २०१४ मध्ये देशात सत्तापालट झाल्यानंतर निहलानी यांची सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष म्हणून केलेली नियुक्ती वादळी ठरली. या अध्यक्षपदामुळे खऱ्या अर्थाने निहलानी चर्चेत आले.
‘उडता पंजाब’साठी ८९ कट्स आणि बाँडपटातील चुंबनदृश्यावर कात्री
सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष म्हणून २०१५ मध्ये सूत्रे हाती घेतल्यानंतर निहलानी यांनी निर्मात्यांना सळो की पळो करून सोडले होते. काही शिव्या, स्त्रियांवरच्या हिंसाचाराची दृश्ये, धार्मिक भावना दुखावल्या जातील असा आशय वा दृश्ये यांना चित्रपटात स्थान मिळणार नाही, असे जाहीर करत त्यांनी अनेक चित्रपटांना सेन्सॉरची कात्री लावली. अनुराग कश्यपची निर्मिती असलेल्या ‘उडता पंजाब’ चित्रपटाला त्यांनी ८९ कट्स सुचवले होते. त्याशिवाय, चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. अखेर या निर्णयाविरोधात अनुराग कश्यप यांनी न्यायालयीन लढाईचा मार्ग निवडला.
न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर फक्त एका दृश्याला कात्री लावत ‘उडता पंजाब’ चित्रपट प्रदर्शित झाला. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष म्हणून निहलानी यांनी केलेल्या मनमानीचा फटका ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटालाही बसला होता. जेम्स बाँड श्रुंखलेतील ‘स्पेक्टर’ या चित्रपटातील चुंबनदृश्यालाही त्यांनी कात्री लावली होती. त्यांच्या या कार्यपध्दतीबद्दल हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नावाजलेल्या निर्माता-दिग्दर्शकांनी त्यांच्यावर टीका केली होती. अखेर २०१७ मध्ये त्यांना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यांनी २०१५ मध्ये एफटीआयआयचे अध्यक्ष म्हणून गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत त्यांना देशद्रोही म्हणत त्यांच्यावर टीका केली होती.
