चित्रकार सुहास बहुळकर यांना डॉ. अरुण टिकेकर संशोधनवृत्ती

सुहास बहुळकर यांच्या संशोधनात्मक कार्याकरिता त्यांना ही संशोधनवृत्ती जाहीर झाली आहे.

‘द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’तर्फे व्यासंगी इतिहासतज्ज्ञ, लेखक व ‘लोकसत्ता’चे माजी संपादक डॉ. अरुण टिकेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिली जाणारी संशोधनवृत्ती प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर यांना जाहीर झाली आहे.

या संशोधनवृत्तीचे हे पहिले वर्ष आहे. सोसायटीने टिकेकर यांच्या निधनानंतर ‘डॉ. अरुण टिकेकर प्रगत संशोधन केंद्र’ची स्थापना केली होती. या केंद्राकडून दरवर्षी ही संशोधनवृत्ती देण्यात येणार आहे.

सुहास बहुळकर यांना ३ फेब्रुवारीला होणाऱ्या एका कार्यक्रमात ही संशोधनवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. प्रसिद्ध लेखिका व समीक्षिका डॉ. विजया राजाध्यक्ष कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

सुहास बहुळकर यांच्या संशोधनात्मक कार्याकरिता त्यांना ही संशोधनवृत्ती जाहीर झाली आहे. ‘बॉम्बे रिव्हायवलिस्ट स्कूल व त्याचा संपूर्ण इतिहास’ हा त्यांचा संशोधनासाठीचा विषय आहे. संशोधनवृत्तीसाठी आलेल्या प्रस्तावांची छाननी करून निवड समितीने हा निर्णय दिल्याचे द एशियाटिक सोसायटीतर्फे स्पष्ट करण्यात आले. यासाठी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीवर डॉ. उषा ठक्कर, डॉ. राजीव नाईक व डॉ. मरियम डोसल यांनी काम पाहिले. संशोधनवृत्ती समारंभावेळी डॉ. टिकेकर लिखित ‘कालचक्र’ या रोहन प्रकाशनच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

तसेच डॉ. टिकेकरांचे व्यक्तिमत्त्व व लेखन यासंबंधी मान्यवरांनी लिहिलेल्या लेखांचे ‘डॉ. टिकेकर’ हे पद्मगंधा प्रकाशनचे पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. शुभदा चौकर, श्रीकांत बोजेवार व सुहास गांगल यांनी पुस्तकाचे संपादन केले आहे. सायंकाळी ५ वाजता एशियाटिक सोसायटीत हा कार्यक्रम होईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Painter suhas bahulkar

ताज्या बातम्या