मुंबई : भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर असलेला पाकिस्तानातील संघटित टोळीचा म्होरक्या आणि दहशतवादी हस्तक शहजाद भट्टी यांच्याशी संबंधित १०२ व्यक्तींची माहिती राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाला मिळाली आहे. या सर्वांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. भट्टी याच्या साथीदारांनी भारतातील तरुणांची दिशाभूल करुन त्यांना दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील पालकांना सावध राहण्याचे व आपल्या पाल्यावर नजर ठेवण्याचे आवाहन दहशतवादविरोधी पथकाने केले आहे.

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, आबीद जाट ऊर्फ आबीद छल, अजमल गुजर, हम्माद मेनन, राणा हुसैन, आश्रफ बशीर आलम हे साथीदार भारतीय तरुणांमध्ये जाळे पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. फेसबुक, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, व्हॅाटस् अप या समाज माध्यमांचा वापर करुन तरुणांशी मैत्री करीत आहेत.

धार्मिक वा इतर संवेदनाशील माहिती समाज माध्यमांवर टाकून भडकावणे, बेरोजगार वा गरजू तरुणांना आर्थिक आमीषे, देशविघातक कृत्यासाठी स्लिपर सेल तयार करणे, अमली पदार्थ तस्करी आदी मार्गाने तरुणांना फितवले जात आहे. त्यामुळे पालकांनी सतर्क राहावे. पाल्याच्या समाज माध्यमावरील खात्यांवर लक्ष ठेवावे वा पाल्याच्या वर्तनात बदल जाणवला तर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन एटीएसने केले आहे.

कोण आहे भट्टी?

मूळचा लाहोरचा असलेला ४५ वर्षीय भट्टी पूर्वी समाज माध्यमांवर ऑनलाइन कंटेंट क्रिएटर (इन्फ्लुएन्सर) म्हणून सक्रिय होता. परंतु आता तो गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला आहे. तो सध्या दुबईत राहून ‘डोगर गँग’ आणि इतर गुन्हेगारी टोळ्यांचे नेटवर्क चालवतो, असे ‘एटीएस’ सूत्रांनी सांगितले. समाज माध्यमाचा गैरवापर करून तो भारतीय तरुणांना जाळ्यात ओढतो आणि त्यांचे मन वळवून त्यांना दहशतवादी कारवाया व गुन्हेगारीकडे प्रवृत्त करतो. अंमली पदार्थ (ड्रग्ज) तसेच शस्त्रास्त्रांची तस्करी आणि हेरगिरी आदी गंभीर गुन्ह्यांत त्याचा सहभाग आहे.

मार्च २०२४ मध्ये जालंधर येथे युट्युबर रॉजर संधूच्या घरावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात त्याचा सहभाग होता. याशिवाय, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार झीशान अख्तरला भारताबाहेर पळून जाण्यास मदत केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र एटीएसने राज्यातील १५० हून अधिक ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले होते. नागपूरसह विदर्भातील विविध जिल्ह्यांतून सुमारे १० संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आले. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातूनही १६ हून अधिक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या संशयितांकडून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली होती. त्यांचे बँक खाते आणि आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत. आता आणखी १०२ जणांची माहिती एटीएसला मिळाली असून या प्रकरणी चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.