मुंबई : राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी आलेल्या हजारो नागरीकांच्या गराड्यात काही लहान मुले पिवळ्या रंगाचे टी शर्ट घालून मंत्र्याची दालने शोधत होती. एकमेकांचे हात हातात धरून ते काहीतरी शोधत होती. त्यांचे चेहरे भेदरलेले होते.
सरकता जिना, कोट टाय घातलेले अधिकारी. लगबग, पाहून आपण कुठे आलो आहोत असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. ती पालघर जिल्ह्रयातील बालपंचायतीचे सदस्य होते. आसे व मोऱ्हांडा गावातील ही १५ ते २० मुले आपल्या गावाच्या व्यथा घेऊन आले होते. गावात ग्रंथालय हवे, रस्त्याचे डांबरीकण करा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करा, शाळेत शिक्षक नाहीत. संगणक नाही अशा मागण्या त्यांच्या होत्या. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या मुलांच्या व्यथा ऐकून घेतल्या.
लहान वयात मुलांना लोकशाही मुल्यांची माहिती व्हावी, त्यांच्यात गावाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी, त्यांच्यातील नेतृत्वगुणांना वाव मिळावा यासाठी परिवर्तन महिला संस्थेने या विद्यार्थांना घेऊन थेट मंत्रालय गाठले. गावांच्या प्रश्नांची जाण असलेली गौरी भडांगे, संदीप घाटाळ,आदित्य भोये, सोहम निसाळ, इंशात मौले, तनुजा कडू, मयुरी कोरडे, प्रणय कोरडे, चेतना गवळी, छाया कडू, गौरी वोतास, तुषार कीर्ती, प्राजक्ता राऊत, कामिनी वाजे, हर्षदा भोईर, दिपिका कोरडे या बालपंचायतीच्या सदस्यांनी बाल विकास मंत्री तटकरे यांची भेट घेतली.
तीन फेब्रुवारी रोजी आसे येथील ग्रामपंचायतीमध्ये बालग्रामसभा पार पडली. त्यांनी या सभेत उपस्थित केलेले प्रश्न घेऊन या मुलांनी मंत्रालयात येऊन गावांचे प्रश्न मांडले. स्वामीनगर व ब्राम्हणगावात ग्रंथालय उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी या आसे बाल पंचायतीच्याच्या सदस्यांनी केली.
अंगणवाडींना संरक्षण भिंत बांधून देण्यात यावी. ग्रामपंचायतीमधील सर्व शाळांना सांस्कृतिक व्यासपिठ बांधून द्यावे अशा १३ मागण्याचे निवेदन या सदस्यांनी दिले. मोऱ्हांडा बाल पंचायतीच्या सदस्यांनी तुळ्याचा पाडा येथील शाळेत संगणक द्या, मोऱ्हांडा शाळा केंद्रात शिक्षक द्या अशी नऊ निवेदने दिली.
आपले प्रश्न मांडण्याची क्षमता आलेली ही मुले मंत्र्यासमोर बिनधास्तपणे प्रश्न मांडत होते. त्यांचे हे प्रश्न ऐकून मंत्री तटकरे काही क्षण आवाक झाल्या. गावाबद्दल असलेली आत्मियता पाहून त्यांनाही आनंद झाला. या सर्व तक्रारींची दखल घेण्याचे आश्वासन तटकरे यांनी दिले.

