मुंबई : पालघर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या गोविंदा पथकातील सहकाऱ्यांच्या आप्तेष्टांकडून उपचारादरम्यान तपासणीचे पैसे मागितल्याने शिवसैनिकांनी रुग्णालयात शिवागळ करत धुडगूस घातला. त्यावरच न थांबता शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली, त्याविरोधात पालघर डॉक्टर्स असोसिएशनने सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली व घडला प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. संघटनेच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणीची शक्यता आहे.

प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठीपुढे पालघर डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने याचिका सादर करण्यात आली. तसेच, डॉक्टरांबाबत घडलेली ही घटना दुर्दैवी असून एकीकडे डॉक्टरांना शिवीगाळ करून धमकावण्यात आले. आता त्यांच्याविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा म्हणजेच अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी स्थानिक पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचे असोसिएशनची बाजू मांडताना वकील निरंजन मुंदरगी यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने या याचिकेची दखल घेतली आणि याचिकेवर मंगळवारी सुनावणी ठेवली. तथापि, प्रभारी मुख्य न्यायमूर्ती घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायामूर्ती म्हणून नियुक्ती झाल्याने असोसिएशनच्या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

दरम्यान, गोविंदा उत्सवात हंडी फोडण्याच्या प्रयत्नात जखमी झालेल्या पथकातील सहकाऱ्यांना शिवसेना कार्यालयाच्या बाजूला असलेल्या रिलीफ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका रुग्णाच्या डोक्याला व मणक्याला दुखापत झाल्याने डॉक्टरांनी सीटीस्कॅनसह पुढील उपचार आवश्यक असल्याचे सांगितले. उपचाराचे शुल्क सुमारे २० हजार रुपये असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यापैकी १० हजार रुपये आयोजकांकडून जमा करण्यात आले; मात्र रुग्णाला सोडण्यावरून आणि सीटीस्कॅनच्या आवश्यकतेवरून वादाला सुरुवात झाली. यानंतर कुंदन संखे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि समर्थक रुग्णालयात दाखल झाले व ””सीटीस्कॅन कशासाठी ? अशी विचारणा त्यांनी केली. वैद्यकीय कारणास्तव तपासणी आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानंतर वातावरण अधिकच तापले. पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी अरेरावी करून शिवीगाळ केली, असे रुग्णालय प्रशासनाने पोलीस तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शहर प्रमुख राहुल घरत, आमदार पुत्र रोहित गावित यांच्यासह १७ जणांविरुद्ध पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.