मुंबई : पालघर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या गोविंदा पथकातील सहकाऱ्यांच्या आप्तेष्टांकडून उपचारादरम्यान तपासणीचे पैसे मागितल्याने शिवसैनिकांनी रुग्णालयात शिवागळ करत धुडगूस घातला. त्यावरच न थांबता शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली, या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी घेतली. तसेच, पालघरच्या पोलीस अधीक्षकांना बुधवारी स्वतः न्यायालयात उपस्थित राहून आरोपींवर काय कारवाई केली हे स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

या घटनेप्रकरणी पालघर डॉक्टर्स असोसिएशनने सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती व घडला प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला होता. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी, वरिष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी शनिवारी पालघरस्थित खासगी रुग्णालयात घडलेल्या घटनेची माहिती न्यायालयाला दिली. ही घटना दुर्दैवी असून एकीकडे डॉक्टरांना शिवीगाळ करून धमकावण्यात आले. आता त्यांच्याविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा म्हणजेच ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी स्थानिक पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचे मुंदरगी यांनी न्यायालयाला सांगितले.

त्याची दखल घेऊन हे प्रकरणही डोंबिवलीस्थित महापालिका रुग्णालयात घडलेल्या घटनेसारखेच आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. तसेच, या याचिकेची प्रत उपलब्ध झाली आहे का ? अशी विचारणा सरकारकडे केली. त्यावर, याचिकेची प्रत सोमवारी मिळाल्याची, परंतु पोलिसांकडून काहीच माहिती देण्यात आली नसल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्याचप्रमाणे या प्रकरणी मुख्य सरकारी वकील युक्तिवाद करणार असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर, न्यायालयाने पालघरच्या पोलीस अधीक्षकांना बुधवारी स्वतः न्यायालयात उपस्थित राहून याप्रकरणी काय कारवाई केली हे सांगण्याचे आदेश दिले.

प्रकरण काय ?

गोविंदा उत्सवात हंडी फोडण्याच्या प्रयत्नात जखमी झालेल्या पथकातील सहकाऱ्यांना शिवसेना कार्यालयाच्या बाजूला असलेल्या रिलीफ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका रुग्णाच्या डोक्याला व मणक्याला दुखापत झाल्याने डॉक्टरांनी सीटीस्कॅनसह पुढील उपचार आवश्यक असल्याचे सांगितले. उपचाराचे शुल्क सुमारे २० हजार रुपये असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यापैकी १० हजार रुपये आयोजकांकडून जमा करण्यात आले; मात्र रुग्णाला सोडण्यावरून आणि सीटीस्कॅनच्या आवश्यकतेवरून वादाला सुरुवात झाली. यानंतर कुंदन संखे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि समर्थक रुग्णालयात दाखल झाले व ”सीटीस्कॅन कशासाठी ? अशी विचारणा त्यांनी केली. वैद्यकीय कारणास्तव तपासणी आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानंतर वातावरण अधिकच तापले. पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी अरेरावी करून शिवीगाळ केली, असे रुग्णालय प्रशासनाने पोलीस तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शहर प्रमुख राहुल घरत, आमदार पुत्र रोहित गावित यांच्यासह १७ जणांविरुद्ध पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.