मुंबई : तपासाची नोंदवही (केस डायरी) योग्य स्थितीत ठेवण्याबाबत उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांनी तसेच राज्याच्या पोलीस महासंचालकांनी तीन वेळा परिपत्रक काढले आहे. त्यानंतरही तपास नोंदवही योग्य स्थितीत ठेवली जात नाही आणि परिपत्रकाचे वारंवार उल्लंघन केले जात असल्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी पालघरस्थित खासगी रुग्णालयातील धुडगूस प्रकरणाच्या निमित्ताने संताप व्यक्त केला. तसेच, यासाठी संबंधित पोलिसांवर सौम्य की कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे, असा प्रश्न करून खुद्द पोलीस महासंचालकांनाच त्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
तपास नोंदवही योग्य स्थितीत न ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती व त्याची वेतनवाढ तीन वर्षे का रोखली जाऊ नये, अशी विचारणा केली होती. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने उपरोक्त आदेश देताना पोलीस अधीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्याला बजावलेली ही कारणे दाखवा नोटीस रद्द केली. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे पोलीस महासंचालकांसमोर ठेवण्याचे आदेश दिले असतानाही, पोलीस अधीक्षकांनी शिस्तभंगाची कारवाई का केली ? तसेच, तीन वर्षे वेतनवाढ रोखण्याचा प्रस्ताव कसा मांडला ? पोलीस महासंचालकांच्या आदेशांच्या उल्लंघनासाठी इतकी किरकोळ शिक्षा मिळते हे आम्ही समजायचे का? त्यांच्या आदेशाला त्यांच्याच विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये हेच महत्त्व आहे का? आपल्या विभागातील सर्वोच्च पदी असलेल्या अधिकाऱ्याचा हाच सन्मान आहे का? अशी प्रश्नांची सरबत्ती करून खंडपीठाने त्यावरून पोलिसांना खडेबोल सुनावले.
तपास नोंदवही योग्य स्थितीत न ठेवल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्याला बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीत, न्यायालयाच्या आदेशाचा किंवा तपास नोंदवही देखभालीसंबंधीच्या पोलीस महासंचालकांच्या परिपत्रकाचा उल्लेख नसल्यावरूनही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणे बंद करा, अशा शब्दांत न्यायालयाने राज्य सरकारला धारेवर धरले आणि पोलिस महासंचालकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पोलिसांवर सौम्य की कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. दरम्यान, हल्ला झालेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अॅट्रोसिटी) कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली.
रमेश म्हात्रेसह अन्य आरोपींवर १९ तारखेपासून खटला
डोंबिवलीतील महापालिकेच्या रुग्णालयात तीन डॉक्टरांवरील हल्ल्याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे याच्यासह अन्य आरोपींविरोधात नुकतेच आरोप निश्चित करण्यात आले. आता १९ सप्टेंबरपासून त्यांच्यावरील खटल्याला सुरुवात होणार असल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली.
