मुंबई : पालघर येथील खासगी रुग्णालयात शिवसैनिकांनी (शिंदे गट) वैद्यकीय कर्मचाऱ्यांना केलेल्या शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणाचा तपास अतिशय निष्काळजीपणे केला जात आहे. कोणतेही महत्त्वाचे पुरावे गोळा न करताच करण्यात येणारा हा तपास हास्यास्पद असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी नोंदवले. तसेच, विशेष पोलीस महानिरीक्षकांना (कोकण विभाग) तपासावर वैयक्तिकरित्या देखरेख ठेवण्याचे आदेश दिले. तसेच, पुढील आठवड्यात तपासाचा अहवाल सादर करण्याचेही स्पष्ट केले.
घटनास्थळाच्या पंचनाम्यात केवळ नोंदवलेल्या जबाबांची पुनरावृत्ती करण्यापलीकडे पोलिसांनी काहीही केलेले नाही. तपास अधिकाऱ्याने कोणताही महत्त्वाचा पुरावा गोळा केलेला नाही किंवा घटनास्थळावरून काहीही जप्त केले नाही. यावरून पालघर पोलीस ठाण्याच्या तपासाचा दर्जा दिसून येतो, असे ताशेरेही न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने उपरोक्त आदेश देताना ओढले. अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या एका गोविंदाला लावलेले सलाईन काढून टाकण्याच्या घटनेचा संदर्भ देताना, घटनास्थळाच्या पंचनाम्यात सलाईनच्या बाटलीचा उल्लेख का नाही ? ती सापडली होती का ? खोली साफ करण्यात आली होती का ? यावरून काय निष्कर्ष काढायचा ? असे प्रश्न न्यायालयाने केले. तसेच, अशा कारणांमुळेच सरकारी पक्षाची बाजू नेहमीच कमकुवत ठरत असल्याचे सुनावले.
सरकारी वकील वैद्यकीय कागदपत्रे जप्त केल्याचा दावा करत असले तरी, पुराव्याचा एक महत्त्वाचा भागच यात नाही याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. त्याचप्रमाणे, हे प्रकरण ज्या गोष्टीमुळे घडले ती जप्त करण्यात आली नसेल, तर न्यायालयात गुन्हा घडल्याचेसिद्ध कसे करणार, असेही न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त करताना सुनावले. त्याआधी, आरोपी हे सत्ताधारी घटक पक्षाशी संबंधित असल्याने ही कारवाई संथ गतीने सुरू असल्याचा डॉक्टर संघटनेने केला. तसेच, फरारी आरोपींपैकी तीन आरोपींना अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला. परंतु, त्यांच्या अर्जाला राज्य सरकारने नाही, तर तक्रारदार या नात्याने आम्ही दंडाधिकारी न्यायालयात विरोध केला. त्यानंतर, न्यायालयाने त्यांचे अर्ज फेटाळल्याची बाबही संघटनेच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने तपास निष्काळजीपणे केला जात असल्याची टीका केली.
अज्ञातांना अटक, मात्र फरारी आरोपी सापडेनात
या प्रकरणी दाखल गुन्ह्यानंतर, एकाला आतापर्यंत अटक करण्यात आली होती. तर नऊ आरोपी फरारी होते. याशिवाय, सात अज्ञात व्यक्तीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला होता. तथापि, नऊ आरोपी अद्याप फरारी असून त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात असल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. याशिवाय, सात नाहीतर १२ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्या सगळ्यांना गुरुवारी अटक केल्याची माहितीही सरकारी वकिलांनी दिली. मात्र, अज्ञात आरोपींचा शोध लागतो, परंतु माहीत असलेल्या नऊ फरारी आरोपींचा छडा लागत नाही. यातून पोलिसांचे तपासाप्रतीचे गांभीर्य लक्षात येत असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले.
