जनतेच्या सोयीसाठी छोटी राज्ये किंवा जिल्हे अधिक सोयीचे ठरतात, असा प्रवाद असला तरी देशात लोकसंख्येच्या तुलनेत दुसऱ्या क्रमाकांचे तर भौगोलिकदृष्टय़ा तिसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत जिल्ह्यांच्या संख्येत मात्र मागे आहे. राज्याच्या स्थापनेनंतर ५४ वर्षांंत नऊच जिल्ह्यांची निर्मिती झाली असून, दहावा पालघर जिल्हा उद्यापासून अस्तित्वात येत आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा २६ जिल्हे होते.
महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी २६ जिल्हे
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा २६ जिल्हे होते. त्यानंतर गेल्या ५४ वर्षांंत फक्त नऊच जिल्ह्यांची भर पडली. राजकीय वादामुळेच नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीत अडथळे येत गेले. राज्याच्या स्थापनेनंतर २१ वर्षांंने म्हणजेच १९८१ मध्ये जालना आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली होती. ऑगस्ट १९८२ मध्ये लातूर आणि गडचिरोली जिल्हे अस्तित्वात आले होते. १ ऑक्टोबर १९९० मध्ये मुंबईचे विभाजन करून मुंबई उपनगर हा जिल्हा तयार करण्यात आला. युती सरकारच्या काळात नंदुरबार, गोंदिया, हिंगोली आणि वाशिम या चार जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर १५ वर्षांंनंतर पालघर जिल्हा अस्तित्वात येत आहे. या जिल्ह्याच्या निर्मितीला मोठय़ा प्रमाणावर विरोध झाला होता.