मुंबई : महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा, वारकरी संप्रदायाचा आणि पंढरपूरच्या आषाढी वारीचा आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा आता जागतिक स्तरावर गौरवला गेला आहे. माहिती व जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या संयुक्त निर्मितीतील ‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ या माहितीपटाची प्रतिष्ठित ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स २०२६’मध्ये ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ या श्रेणीत भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून निवड झाली आहे. या यशामुळे महाराष्ट्राच्या समृद्ध भक्तिपरंपरेची आणि संतांनी दिलेल्या समता, मानवता व बंधुभावाच्या संदेशाची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेल्या पंढरपूर वारीची शेकडो वर्षांची परंपरा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली. इंग्रजी भाषेतील २२ मिनिटांच्या या माहितीपटातून वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य, संतपरंपरेचे योगदान आणि वारीमागील आध्यात्मिक विचार प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत. डिस्कव्हरीच्या जगभरातील विविध वाहिन्यांवरून या माहितीपटाचे प्रसारण करण्यात आले आहे.
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांनी दिलेला भक्ती, समता, मानवता आणि बंधुभावाचा संदेश भाषेच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात हा माहितीपट महत्त्वपूर्ण ठरला आहे. दरम्यान, या बहुमानामुळे महाराष्ट्राची भक्तिपरंपरा, संतसाहित्य, सामाजिक समतेचा संदेश आणि वारीची वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे, असे मत माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले.
वारी सर्वांना एकत्र आणणारी महान परंपरा : मुख्यमंत्री
या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. पंढरपूर वारी ही भक्तिमार्गातील अतिशय प्राचीन परंपरा असून, जात, धर्म, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न करता सर्वांना विठुरायाच्या भक्तिरंगात एकत्र आणते, असे त्यांनी सांगितले. वारीची महान परंपरा, तिच्यामागील उद्दिष्टे आणि विचार जगभर पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाने वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्या सहकार्याने हा माहितीपट तयार केला. या माहितीपटाला राष्ट्रीय विजेत्याचा बहुमान मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माहिती व जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांचे अभिनंदन केले. वारीची गौरवशाली परंपरा जगासमोर मांडणारा हा माहितीपट सर्वांनी पाहावा, असे आवाहनही त्यांनी केले.
