मुंबई : अनुसूचित जमातीच्या (ST) विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतील भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली. २०१८ पासून स्वयंम योजनेच्या भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली नव्हती.

विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहांतील उपलब्ध प्रवेश क्षमता कमी पडू लागल्याने २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेणाऱ्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना’ राबविण्यात येते.

योजनेत इयत्ता १२ वी नंतरचे उच्च शिक्षण किंवा इयत्ता १० वी नंतरच्या दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या व्यावसायिक किंवा तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या परंतु शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व निर्वाह भत्ता यासाठी निश्चित केलेल्या दराने दरवर्षी एकत्रित अशी रक्कम बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.

असे आहेत सुधारित दर :

  1. मेट्रो शहरे : मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्यांकरिता भोजन भत्ता ४२०००, निवास भत्ता २८०००, निर्वाह भत्ता १००००. एकूण ८०,००० रुपये प्रती विद्यार्थी प्रतीवर्ष मिळतील.
  2. महसुली विभागीय मुख्यालय: क वर्ग महानगरपालिका क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता भोजन भत्ता ३७०००, निवास भत्ता २१०००, निर्वाह भत्ता १०००० असे एकूण ६८००० रुपये प्रती विद्यार्थी प्रतीवर्ष मिळतील.
  3. जिल्हा ठिकाणी : शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्यांकरिता भोजन भत्ता ३२०००, निवास भत्ता १७०००, निर्वाह भत्ता ८००० एकूण ५७००० रुपये प्रती विद्यार्थी प्रतीवर्ष मिळतील.
  4. अन्य ठिकाणी : शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता ३००००, निवास भत्ता १३०००, निर्वाह भत्ता ७००० असे एकूण ५०००० रुपये प्रती विद्यार्थी प्रतीवर्ष मिळतील.
  5. शैक्षणिक साहित्य खरेदी रक्कम: वैद्यकीय व अभियांत्रिकीय विद्यार्थ्यांना दरवर्षी ८००० रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी रु.४००० रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी एकरकमी मिळणार आहे.