चार दशकानंतर ‘संस्कार प्रकाशना’तर्फे पुनर्मुद्रित

ख्यातनाम श्रेष्ठ वाग्येकार आचार्य एस. एन रातंजनकर यांच्या दुर्मीळ बंदिशींचा खजिना लवकरच ग्रंथरूपाने संगीतप्रेमी आणि रसिकांसमोर  उलगडणार आहे. तब्बल चार दशकानंतर ‘अभिनव गीतमंजरी’ आणि ‘तान संग्रहा’तून रातंजनकरांचा हा अनमोल खजिना ‘संस्कार प्रकाशन’तर्फे पुनर्मुद्रित केला जात आहे. हा अभिजात ठेवा ग्रंथरुपात यावा, यासाठी प्रकाशक प्रसाद कुलकर्णी यांना रातंजनकरांचे शिष्य पंडित यशवंतबुवा महाले यांचे सहकार्य लाभले आहे.

भारतीय अभिजात संगीतातले विसाव्या शतकातले ज्ञानयोगी आणि साधक अशी आचार्च एस. एन रातंजनकरांची ओळख आहे. त्यांचा लखनऊ संगीत महाविद्यालयात अभिजात संगीताचे अध्यापन,अध्ययन आणि संशोधनात लीलया संचार होता. त्यांचे गुरू ऋषिमुनी संगीतोध्दारक पंडित विष्णु नारायण भातखंडे यांचे ज्ञानदानाचे कार्य रातंजनकर यांनी पूर्ण केले. सुमारे ३० वर्षं लखनऊच्या संगीत महाविद्यालयाचे काम त्यांनी निष्ठेने पाहिले. व्यासंग आणि कोमल भाव यांचा सुंदर समन्वय त्यांच्या गायकीत दिसून येत असे. त्याचे व्यक्तिमत्व ॠषीतुल्य होते.

प्रचलित त्याचप्रमाणे अप्रचलित आणि अनवट रागांवर त्यांची जबरदस्त हुकूमत होती. ते उस्ताद फैय्याझ खाँसाहेब यांचे शिष्य होते. त्या काळात संगीताच्या क्षेत्रात प्रचंड मानाच्या समजल्या जाणाऱ्या ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याचा अपूर्व संगम साधणारा सांगीतिक अनुबंध रातंजनकर यांनी तयार केला. अशाच थोर संगीताचार्याच्या बंदिशींचा आणि तान संग्रहाचा खजिना ग्रंथरुपाने येत्या काही महिन्यांत रसिकांच्या हाती पडणार आहे. केवळ ‘भारतीय शास्त्रीय संगीत’ या विषयावरीलच पुस्तकांचे प्रकाशन करणाऱ्या’संस्कार प्रकाशन’ या संस्थेतर्फे चाळीस वर्षांनंतर या ग्रंथांचे पुनर्मुद्रण केले जाणार असल्याचे प्रकाशक प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.
रातंजनकरांविषयी!
– १९५७ साली रातंजनकरांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-संगीत नाटक अकादमीने आपल्या सर्वोच्च सन्मानाने म्हणजेच ‘रत्न-सदस्यता’ देऊन त्यांचा गौरव केला.
-मद्रास संगीत अकादमीने ‘संगीत तज्ज्ञ आणि विद्वान’ पदवीनेही त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

-संस्कृत भाषा त्यांचा आवडीचा विषय होता. त्याचप्रमाणे मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, व्रजभाषा, प्राकृत,बुंदेलखंडी बोली, बंगाली, पंजाबी, उर्दू, कन्नड या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.
सुमारे चाळीस वर्षांनी थोर संगीताचार्य एस. एन रातंजनकर यांच्या बंदिशीं आणि तान संग्रहाचा अनमोल खजिना संस्कार प्रकाशनातर्फे पुनर्मुद्रित होत आहे. याचा अतिशय आनंद आहे. अभिजात शास्त्रीय संगीताच्या परंपरेच्या या अमूल्य ठेव्याचे जतन आणि संवर्धन करणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. या पुस्तकासोबती बंदिशींची सीडी देखील देण्यात येणार आहे.

प्रसाद कुलकर्णी,  संस्कार प्रकाशन