scorecardresearch

पंडितांनी आपल्या स्वार्थासाठी समाजात उच्चनीचता निर्माण केली; सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान

“सत्य हाच धर्म हे तत्त्वज्ञान आपण…”

Mohan Bhagwat
मोहन भागवत ( इंडियन एक्स्प्रेस छायाचित्र )

सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेलं एक विधान चर्चेत आलं आहे. पंडितांनी आपल्या स्वार्थासाठी समाजात उच्चनीचता निर्माण केली. भगवद्गीता व अन्य धर्मग्रथांनी समाजाला सत्य सांगितले. पण, आपण भेदाभेद निर्माण करून सत्याचे अनुसंधान केलं नाही. समाज विखुरला गेल्याने परकीय आक्रमकांनी त्याचा लाभ घेतला, असे मत भागवत यांनी व्यक्त केलं आहे.

मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात रोहिदास समाज पंचायत संघ आणि वसुधा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंतीनिमित्त रविवारी ( ५ फेब्रुवारी ) कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा सरसंघचालक बोलत होते.

हेही वाचा : “काँग्रेसमधून बाहेर ढकलण्यासाठी षडयंत्र रचलं”, सत्यजीत तांबेंच्या आरोपांवर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“संत रोहिदास महाराज यांच्यावर बोलायला मिळणे हे आपले भाग्य आहे,” असे म्हणत मोहन भागवत म्हणाले की, “धर्माने वागून आपण जगाचे कल्याण करू शकतो, हा विश्वास ६०० वर्षांपूर्वी संत रोहिदास यांनी त्याच्या ‘रोड मॅप’सकट समाजात जागवला आहे. ‘सर्वाभूती एकच’ हे तत्व आपण आधी विसरलो त्यामुळे स्वार्थ मोठा झाला आणि त्याचा फायदा परकीय आक्रमकांनी घेतला. वैयक्तिक स्वार्थामुळे चुकीच्या रूढी परंपरा अस्तित्वात आल्या. सत्य हाच धर्म हे तत्त्वज्ञान आपण विसरलो. त्यामुळे समाजात उच्चनीचता अस्तित्वात आली, श्रमप्रतिष्ठा लयाला गेली. त्याचे दुष्परिणाम आज आपण बघतो आहोत.”

“‘मन चंगा तो कठौती मे गंगा हे अनुभूतीने सिद्ध करून दाखवले. संत मीराबाई, राजा पिपा, चित्तोडची महाराणी यांना शिष्यत्व देऊन संत पदाला पोहोचवणारे संत रोहिदास हे खऱ्या अर्थाने संत शिरोमणी होते,” अशा शब्दांत भागवत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा : पुणे: “कुलकर्णी, टिळकांचा मतदारसंघ गेला, आता नंबर बापटांचा?”,पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील बॅनर्स चर्चेत!

“संत रोहिदासांनी आपल्या १५१ वर्षांच्या दीर्घायुष्यात, जन्माने श्रेष्ठत्व मिळत नाही तर ते आचरणाने मिळते; तोच खरा शाश्वत धर्म हे तत्त्वज्ञान आपल्या नि:स्पृह आचरणाने समाजाला दाखवून परिवर्तनाचा मार्ग प्रशस्त केला. त्याच मार्गाने जाऊन भारताला विश्वगुरू करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया,” असेही मोहन भागवत यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 09:21 IST
ताज्या बातम्या