मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे याला डॉक्टर पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी सोमवारी अटक करण्यात आली. त्यानंतर, अतिरिक्त महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असता गर्जे याला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे (२८) यांनी शनिवारी रात्री वरळी येथील निवासस्थानी आत्महत्या केली होती.

गर्जे याच्याशी होणाऱ्या वादांमुळे गौरी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. तसेच, गौरी यांच्या वडिलांनी पोलिसांत तशी तक्रारही नोंदवली होती. त्याआधारे पोलिसांनी गर्जे याच्यासह त्यांची बहीण आणि भावावर गौरी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. गर्जे याला सोमवारी अटक करण्यात आली. तसेच, वैद्यकीय तपासणीनंतर अतिरिक्त महानगरदंडाधिकाऱ्यांकडे हजर करण्यात आले. त्यावेळी, गौरी यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप यायचा आहे.

शिवाय, अन्य आरोपी फरारी असल्याचे पोलिसांतर्फे गर्जे याला पोलीस कोठडी सुनावण्याची मागणी करताना न्यायालयाला सांगण्यात आले. तर गर्जेने तपासात सहकार्य करण्याची तयारी दाखवली. त्यामुळे, त्याच्याकडून जप्त करण्यासारखे काहीच नसल्याने त्यांना किमान पोलीस कोठडी सुनावण्याची मागणी गर्जे याच्या वतीने न्यायालयाकडे करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने गर्जे यांना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.