मुंडे बंधू-भगिनींमधील राजकीय फटकेबाजी

मुंबई : भिन्न पक्षांतील नेत्यांमध्ये केवळ आरोप-प्रत्यारोप व खालच्या स्तरावरील टीका-टिप्पणी हेच होते असा समज व्हावा असे राजकीय वातावरण असताना नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या नेत्रालयाच्या उद्घाटनाच्या समारंभात सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी व त्यांनी एकमेकांची फिरकी घेत केलेली राजकीय फटकेबाजी हे सध्या विरळ होत जाणारे दृश्य बुधवारी दिसले.

डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाचे उद्घाटन बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. रवींद्र नाटय़ मंदिरात झालेल्या या समारंभात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे  उपस्थित होते. या सोहळय़ात पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनी एकमेकांची फिरकी घेत फटकेबाजी केली.

नेत्रालयाचा कार्यक्रम असल्याने लेन्स या शब्दावरून राजकीय कोटी करत करत पंकजा मुंडे यांनी खुमासदार भाषण केले. अनुभवाच्या आणि राजकीय दृष्टीच्या लेन्स कोणाकडेही नसतील असे ज्येष्ठ नेते शरद पवार, सर्वाशी प्रेमाने वागणारे व ज्यांच्या लेन्स सर्वाना चालतील असे बाळासाहेब थोरात, नवीन चेहरा व नवीन दृष्टी असणारे व ज्यांच्या लेन्सकडे युवक बघत आहेत ते आदित्य ठाकरे, सुसंस्कृत लेन्स असणारे अमित देशमुख असा उल्लेख पंकजा यांनी केला. गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांच्या लेन्समधून पाहता पाहता स्वत:ला घडवणारे आणि आता शरद पवार यांच्या लेन्समधून बघण्याचे भाग्य लाभलेले आमचे बंधू धनंजय मुंडे अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची फिरकी घेतली.

भाषणाला उठल्यावर धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना जाता जाता एक हलकीशी टपली मारत राजकीय चिमटा काढण्याच्या शैलीबद्द्ल एक प्रकारे दाद दिली. त्यानंतर पंकजा यांच्या लेन्सवरील कोटीला उत्तर देताना, पंकजाताई राजकारणात कधी कधी लेन्सचा झोत बदलावा लागतो. तुमचे भाषण ऐकत असताना आदित्य ठाकरे मला म्हणाले की पंकजाताई जर महाविकास आघाडीची लेन्स लावून बघू लागल्या तर किती चांगले होईल, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला. त्यावरून सभागृहात हशा उसळला आणि महाराष्ट्रातील पूर्वीच्या खेळीमेळीच्या आणि सुसंस्कृत राजकीय फटकेबाजीचे विरळ दर्शन श्रोत्यांना घडले.