पानसरे हत्या प्रकरण

भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करीत असलेल्या राज्य पोलिसाच्या विशेष पथकाला (एसआयटी) सनातन संस्थेच्या पनवेल, मुंबई येथील परिसरातून गेल्या आठवडय़ात मानसिक आजारावरील औषधांची यादी सापडली. सनातन संस्थेच्या गोवा येथील मुख्यालयात ‘जन समूहाला संमोहित’ करण्याचा प्रकार घडत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे औषधांची ही यादी सनातन संस्थेविरुद्धचा महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

पानसरे यांची फेब्रुवारी २०१५ला हत्या झाली. याप्रकरणी सनातन संस्थेच्या भूमिकेची चौकशी विशेष तपास पथक करत आहे. सापडलेल्या यादीत नैराश्य, वेडेपणा, निद्रानाश, चिंता आदी आजारावरील औषधांचा समावेश आहे. या यादीमधील   एप्रिल २०१६ आणि ऑगस्ट २०१६ या कालावधीत औषधे घेण्यात आली. त्यात १४ हजार गोळ्यांचा (टॅबलेट) समावेश आहे. एसआयटीने विविध मानसिक आजारांवर वापरण्यात येणाऱ्या औषधांचे काही नमुने जप्त केले आहे.

सनातन संस्थेत सदस्यांना बळजबरीने प्रभावित करण्यासाठी संमोहित केले जाते, असा आरोप करत संस्थेच्या काही माजी सदस्यांनी २०११ ला मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. संमोहन तज्ज्ञ जयंत बालाजी आठवले हे सनातन संस्थेचे प्रमुख आहेत. पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेची चौकशी सुरू आहे. दाभोलकर यांची २०१३ ला हत्या झाली होती.

गेल्या वर्षी फेब्रुवारी २०१६ ला पानसरे आणि त्यांची पत्नी उमा सकाळी फिरायला गेले असता कोल्हापूर येथे गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अगदी जवळून त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या होत्या.

पानसरे यांचा उपचारादरम्यान पाच दिवसांनी मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीला डोक्याला दुखापत झाली. हा हल्ला आणि १८ महिन्यांपूर्वी पुण्यात नरेंद्र दाभोलकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यासारखा होता.

गेल्या आठवडय़ात सीबीआयने दाभोलकर हत्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यात हिंदू जनजागृती समितीचे सदस्य शल्यचिकित्सक वीरेंद्र तावडे यांचा मुख्य सूत्रधार म्हणून नाव आहे. सनातन संस्थेची ही समिती एक शाखा आहे. सीबीआयने दाभोलकर प्रकरणात तावडे यांना अटक केली आहे. सध्या ते पानसरे हत्याकांडाची चौकशी करत असलेल्या एसआयटीच्या कोठडीत आहेत.

संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, हा बदनामीचा प्रकार आहे. आमच्याकडे औषधासाठी कक्ष आहे. आम्ही हा कक्ष डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपलब्ध करून देतो.

आमच्याकडे औषधाच्या योग्यप्रकारे नोंदी आहेत. आमच्या संघटनेला लक्ष्य करण्याचा प्रकार आहे, असे आम्हाला वैयक्तिकरीत्या वाटते. देशात बहुमताचे हिंदू सरकार असताना अशाप्रकारे हिंदू संघटनेला वागणूक मिळणे हे फारच दु:खदायक आहे.