मुंबई : पनवेलमधील डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्याच्या गलथान व्यवस्थापनावरून भाजपचे पनवेलमधील आमदार विक्रांत पाटील यांनी सिडकोच्या गैरकारभारावर लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून गुरूवारी ताशेरे ओढले. ही कचराभूमी येथून तातडीने हलविण्याची व बेजबाबदारपणे व्यवस्थापन करून सामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या सिडकोच्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी त्यांनी विधान परिषदेत केली. त्यावर विभागीय आयुक्तांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन दिले.
या कचराभूमीमुळे तळोजा, पेंदर पासूनची गावेच्या गावे प्रदूषणाच्या विळख्यात आहे. इथले पाण्याचे स्त्रोत या कचऱ्यामुळे प्रदूषित होत असून हे पाणी पिऊन घोट गाव येथे १९ गायींचा मृत्यू झाल्याचा प्रकार त्यांनी निदर्शनास आणून दिला. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही (एमपीसीबी) कारवाई केलेली नाही. प्रदूषणामुळे इथल्या रहिवाशांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढते आहे. महिलांना गर्भधारणेत अडचणी येत आहेत. श्वसनाचे विकार वाढले आहेत, याकडे विक्रांत पाटील यांनी लक्ष वेधले. त्यावर गायींच्या मृत्यूची सविस्तर चौकशी केली जाईल, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बाधित क्षेत्राची पाहणी केली जाईल, त्याकरिता विभागीय आयुक्तांची बैठक बोलावून चौकशी करू, असे आश्वासन सामंत यांनी दिले. मात्र सामंत यांच्या उत्तराने पाटील यांचे समाधान झाले नाही.
सामंत यांचे उत्तर गोलमाल-प्रसाद लाड
लक्षवेधीत विचारलेल्या प्रश्नांना स्पष्ट उत्तर देण्याऐवजी उदय सामंत गोलमाल उत्तर देत आहेत, असा टोला भाजपचे प्रसाद लाड यांनी लगावला. कचराभूमीवर कचऱ्यावर प्रक्रिया करणारे अत्याधुनिक युनिट बसवून हा प्रश्न सोडविता येईल. निर्धारित वेळेत हे काम करता येईल. परंतु, अशा रितीने तुम्ही पनवेलला तिसरी मुंबई करणार आहात का, असा प्रश्न लाड यांनी केला.
