मुंबई : नवी मुंबई आणि कर्जत प्रवास जलदगतीने होण्यासाठी पनवेल ते कर्जत नवीन रेल्वे मार्गिका प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला असून प्रकल्पाचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ (एमयूटीपी ३) अंतर्गत पनवेल ते कर्जत दुहेरी रेल्वे मार्गिका उभारण्याचे काम हाती घेतला. पनवेल ते कर्जत २९.६ किमी लांबीचा दुहेरी मार्गाचा प्रकल्प २,७८२ कोटी रुपयांच्या खर्चातून विकसित केला जात आहे.
या मार्गामुळे पनवेल आणि कर्जतदरम्यान पर्यायी लोकल सेवा सुरू होणार असून कल्याणमार्गे धावणाऱ्या रेल्वे वाहतुकीवरील ताण मोठ्याप्रमाणात कमी होणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली सर्व सरकारी आणि खासगी जमीन संपादित करण्यात आली आहे. याशिवाय सर्व मोठे आणि छोटे पूल, उड्डाणपूल (आरओबी), भुयारी मार्ग, बोगदे आणि अस्तरीकरणाची कामे बहुतांश पूर्ण झाली आहेत.
कर्जत येथील रेल्वे उड्डाणपूल पूर्ण झाला असून सध्या रुळ जोडणीचे काम सुरू आहे. पनवेल रेल्वे उड्डाणपुलाचे कामही अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मोहापे आणि किरावली येथील उड्डाणपुले वाहतुकीसाठी सुरू झाली आहेत. पनवेल, चिखले आणि मोहापे येथील स्थानकांच्या इमारतींची कामे पूर्ण झाली असून त्याठिकाणी अंतर्गत प्रणालींची उभारणी सुरू आहे.
चौक आणि कर्जत स्थानकांवरील कामेही वेगाने प्रगतीपथावर आहेत. रुळ जोडणी आणि खडी टाकण्याची कामे युद्धपातळीवर सुरू असून, ६४ किमीपैकी सुमारे ५८ किमी रुळ जोडणी पूर्ण झाली आहे. जवळपास ६० किमी मार्गावर खडी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. सिग्नलिंग आणि दूरसंचार यंत्रणेच्या कामातही सुमारे ८५ टक्के प्रगती झाली आहे.
या प्रकल्पामध्ये ३ बोगदे, आधुनिक रेल्वे स्थानके, प्रगत सिग्नलिंग प्रणाली, पनवेल आणि कर्जत येथील रेल्वे उड्डाणपूल तसेच आव्हानात्मक भूभागावर उभारण्यात आलेल्या विस्तृत पुलांचा समावेश आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबई आणि कर्जत परिसरातील प्रवाशांना अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच मध्य रेल्वेची परिचालन क्षमता वाढून मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या निवासी, औद्योगिक आणि व्यावसायिक विकासाला चालना मिळणार आहे, असा विश्वास मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) अधिकाऱ्याने व्यक्त केला.
– पनवेल-कर्जत या नव्या २९.६ किमीच्या दुहेरी रेल्वे मार्गावर पनवेल, चिखले, पोयंजे, चौक, कर्जत अशी पाच स्थानके आहे.
– या प्रकल्पासाठी २,७८२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
– या मार्गात ४७ लहान-मोठे पूल, पादचारी पूल आहेत.
– पाच उड्डाणपूल, १५ भुयारी मार्ग
