मुंबई : मुंबई महानगरात झपाट्याने लोकवस्ती वाढत असून त्याबरोबरीने लोकल प्रवाशांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. मुंबई महानगराचा विस्तार लक्षात घेऊन प्रत्येक ठिकाणांना जलदगतीने जोडण्यासाठी, रेल्वे मार्ग वाढविण्यात येत आहेत.

सध्या पनवेल ते कर्जत दुहेरी रेल्वे मार्गिकेचे काम वेगात सुरू आहे. या मार्गावर तीन बोगदे असून मुंबई महानगरातील सर्वात मोठा बोगदा वावर्ले येथे बांधला जात आहे. तसेच प्रत्येक बोगदा हा जलरोधक असल्याने, बोगद्यात पाणी गळतीची समस्या नसेल. तसेच या तिन्ही बोगद्यात खडीविना रेल्वे मार्ग तयार केला आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ (एमयूटीपी ३) अंतर्गत पनवेल ते कर्जत दुहेरी रेल्वे मार्गिका बांधण्याचे काम हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या कामातील सर्वात आव्हानात्मक काम म्हणजे बोगदा तयार करणे होते. या रेल्वे मार्गावर नढाल, किरवली आणि वावर्ले असे तीन ३,२०६ मीटर लांबीचे बोगदे तयार केले जात आहेत. यापैकी बोगदा क्रमांक २ असलेला वावर्ले हा बोगदा २,६३९ मीटर लांबीचा आहे.

हा बोगदा पूर्ण झाल्यास मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे. सध्या मुंबई महानगरात ठाणे ते दिवा रेल्वे मार्गातील १.३१ किमीचा पारसिक बोगदा हा उपनगरीय रेल्वे मार्गावर सर्वात लांब बोगदा समजला जातो. मात्र आता या बोगद्यापेक्षा लांब बोगदा पनवेल ते कर्जतदरम्यान वावर्ले येथे २.६२ किमी लांबीचा बोगदा तयार करण्यात येत आहे. तसेच या मार्गातील बोगदा क्रमांक १ नढालची लांबी २३४ मीटर आणि बोगदा क्रमांक ३ किरवलीची लांबी २३३ मीटर आहे.

पनवेल ते कर्जत रेल्वे मार्गातील तिन्ही बोगद्यातील मार्ग हे खडीविरहित आहे. बोगद्यात खडीचा मार्ग नसल्याने, वारंवार देखभाल-दुरूस्तीचे कामे हाती घ्यावी लागत नाही. तसेच, बोगद्यातील रेल्वे रूळाच्यामध्ये दोन मजबूत सिमेंट-क्राँक्रिटचे बाॅक्स तयार केले आहेत. या बाॅक्समुळे लोकलचा अपघात कमी होण्यास मदत होईल.

वेगाने धावणाऱ्या लोकलचे चाक रेल्वे रुळावरून घसरल्यास, या बाॅक्सच्या आधाराने संपूर्ण लोकल पूर्णपणे घसरणार नाही. त्यामुळे लोकलचा मोठा अपघात होण्यापासून बचाव होईल. तसेच बोगद्यात कामगारांसाठी विश्रांतीगृह, देखभाल-दुरूस्तीचे सामग्री, प्रथमोपचार पेटी व इतर आवश्यक सामग्री असणार आहेत.

पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे मार्गाचे सद्यस्थितीत ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्याच्या आत १०० टक्के कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य एमआरव्हीसीचे आहे. १०० टक्के काम पूर्ण झाल्यास, एमआरव्हीसीद्वारे हा प्रकल्प मध्य रेल्वेकडे सुपूर्द केला जाईल. त्यानंतर, लोकल सेवेबाबत निर्णय घेतला जाईल. साधारणपणे डिसेंबर २०२६ पर्यंत लोकल सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.

  • पनवेल-कर्जत या नव्या २९.६ किमीच्या दुहेरी रेल्वे मार्गावर पनवेल, चिखले, पोयंजे, चौक, कर्जत अशी पाच स्थानके आहे.
  • या प्रकल्पासाठी २,७८२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
  • या मार्गात ४७ लहान-मोठे पूल, पादचारी पूल आहेत.
  • पाच उड्डाणपूल, १५ भुयारी मार्ग