मुंबई : केंद्रीय पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी घालण्यापूर्वीच गिरगाव आणि आसपासच्या परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी काही वर्षे आधीच शाडूच्या मातीपासून पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती घडविण्यास सुरुवात केली होती. मात्र, वजनदार गणेशमूर्ती विसर्जनस्थळी नेण्यात येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन यंदा काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती साकारली आहे. त्यात अखिल मुगभाट सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आणि खिल खोताची वाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा समावेश आहे.
मुंबईमधील गिरगाव परिसरातील मुगभाट येथे तब्बल ९३ वर्षांपूर्वी १९३२ मध्ये अखिल मुगभाट सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. पारतंत्र्यकाळात सुरू झालेल्या या गणेशोत्सवात सांस्कृती, प्रबोधनपर कार्यक्रमांवर भर देण्यात येत होता. भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि कालौघात गणेशोत्सावाचे स्वरुप बदलेत गेले. काळानुरुप या मंडळाच्या कार्यक्रमांची रुपरेषा बदलत गेली. मंडळातील काही तरुणांनी १९८१ मध्ये ‘भारतीय संस्कृती आणि तिचा विस्तार’ या संकल्पनेवर गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा >>>म्हाडा घरांच्या किमतीत वाढ, अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ऐनवेळी किंमतीत बदल करण्याची वेळ
मुंबईकरांना देश-विदेशातील गणेशमूर्तीचे दर्शन घडविण्याचा संकल्प मंडळाने सोडला. मंडळाने १९८१ पासून २००२ पर्यंतच्या काळात दरवर्षी विदेशातील, तसेच महाराष्ट्राच्या अन्य भागातील प्रसिद्ध गणेशमूर्ती साकारली. चिन, जपान, कम्बोडिया, श्रीलंका, भूतान आदी देशांमधील, तसेच महाराष्ट्रातील हेदवी, वाई येथील प्रसिद्ध गणपतीची २० – २१ फूट उंच मूर्ती साकारली होती. देश-विदेशातील गणेशमूर्तींचे दर्शन घडविणारे हे गणेशोत्सव मंडळ अल्पावधीतच मुंबईकरांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले. मात्र २००८ मध्ये उंच गणेशमूर्ती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर नेण्यात आली. मात्र गिरगाव चौपाटीवर पोहोचल्यानंतर अचानक ट्रॉलीचे चाक निखळले आणि उंच गणेशमूर्ती कोसळली. मूर्तीखाली दोन कार्यकर्ते चिरडले गेले. गंभीर जखमी झालेल्या दोन्ही कार्यकर्त्यांवर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या. त्यानंतर मंडळाने कागदाच्या लगद्यापासून पाच अश्व जोडलेल्या रथावरील १७ फूट उंच सूर्यनारायण अवतारातील गणेशमूर्ती साकारण्याचा निर्णय घेतला. प्रसिद्ध मूर्तिकार अविनाश पाटकर मंडळाच्या मदतीला धावून आले.