डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्य छपाईचा पाच कोटींचा कागद वापराविना

राज्य शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे यांचे आतापर्यंत १ ते २१ खंड प्रकाशित करण्यात आले आहेत.

मधु कांबळे, लोकसत्ता

मुंबई : राज्य शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याला प्रचंड मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे खंडाच्या नऊ लाख प्रती छापण्याचे आदेश काढण्यात आले, त्यासाठी ५ कोटी ४५ लाख रुपयांचा कागद खरेदी करण्यात आला, परंतु गेल्या चार वर्षांत केवळ ३३ हजार ग्रंथांची छपाई पूर्ण करण्यात आली. त्यामुळे खरेदी केलेला कागद धूळ खात पडला आहे.

केवळ बाबासाहेब आंबेडकरांचेच नव्हे तर  इतर मौलिक व ऐतिहासिक ठेवा असलेले साहित्य, तसेच विधिमंडळाचे अधिवेशन, निवडणुकांशी संबंधित साहित्याची छपाई करणाऱ्या शासकीय मुद्रणालय या महत्त्वाच्या विभागाकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष असल्याचे त्यातून समोर आले आहे. जुनी यंत्रे आणि अपुरे मनुष्यबळ अशा अवस्थेतही गुवणत्ता, अचूकता गाणि गोपनीयता याचे काटेकोरपणे पालन करून विहित कालावधीत दिलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न येथील कर्मचारी वर्ग करीत आहे, परंतु त्याच्या मर्यादाही आहेत, असे शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालयाचे प्रभारी संचालक रूपेंद्र मोरे यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे यांचे आतापर्यंत १ ते २१ खंड प्रकाशित करण्यात आले आहेत. सातत्याने या ग्रंथांचे पुनर्मुद्रण करावे लागते. १९ जानेवारी २०१७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीच्या मागणीनुसार ९ खंडांच्या प्रत्येकी एक लाख याप्रमाणे ९ लाख प्रतींची छपाई करण्यासंबंधीचे पत्र संचालकांनी मुंबई, पुणे व नागपूर येथील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयांना पाठिवले आहे.

त्यासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये ५ कोटी ४५ लाख ४४ हजार ६७२ रुपये किमतीचा ६१९ मेट्रिक टन कागद आणि ८ लाख १७ हजार २०० रुपये किमतीचे बाईंिडग कापड खरेदी करण्यात आले.

मात्र गेल्या चार वर्षांत केवळ ३३ हजार प्रतींची छपाई झाली आहे. वेगवेगळय़ा ग्रंथागारांमध्ये वितरणासाठी ३ हजार ६७५ प्रती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अ‍ॅड. सतीश कांबिये यांनी माहिती अधिकारातून हा तपशील संचालनालयाकडून मिळविला आहे. साडेपाच कोटी रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेला कागद वेगवेगळय़ा ठिकाणी धूळ खात पडला आहे, असे सांगण्यात येते.

अपुरा कर्मचारीवर्ग, जुनी यंत्रे यांचा परिणाम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याला प्रचंड मागणी आहे, परंतु मुद्रणालयांतील जुनी यंत्रे आणि अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे ती पूर्ण करता येत नाही, अशी कबुली संचालक रूपेंद्र मोरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. पुस्तकांसाठी खरेदी केलेला कागद हा उत्तम दर्जाचा आहे, तो अनेक वर्षे टिकतो, तो सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली. मोठय़ा प्रमाणावर ग्रंथ छापायचे तर ते ठेवायचे कोठे, आमच्याकडे गोदामांची व्यवस्था नाही, असे त्यांनी निदर्शनास आणले. बाइंडिंगची फक्त दोन यंत्रे आहेत. ती अपुरी पडतात. हातशिलाई करावी लागते, त्याचा वेग फारच कमी असतो. मुंबई, पुणे, नागपूर, येथील मुद्रणालयांमधील ६० टक्के कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तरीही जादा वेळ काम करून दिलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो, असे मोरे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Paper worth rs 5 crore for printing of babasaheb ambedkar s literature remain unused zws

ताज्या बातम्या