scorecardresearch

पप्पू कलानीला जन्मठेप

उल्हासनगरचे बिहारीकरण करत या शहराचा तथाकथित अनभिषिक्त सम्राट म्हणून वावरणारा माजी आमदार आणि विद्यमान नगरसेवक सुरेश बुधरमल…

पप्पू कलानीला जन्मठेप

उल्हासनगरचे बिहारीकरण करत या शहराचा तथाकथित अनभिषिक्त सम्राट म्हणून वावरणारा माजी आमदार आणि विद्यमान नगरसेवक सुरेश बुधरमल ऊर्फ पप्पू कलानी याला मंगळवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश्वरी बापट-सरकार यांनी इंदर भटिजा हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पप्पूसह त्याच्या तीन साथीदारांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून अन्य दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींना पाच हजार रुपयांचा दंड व तो न भरल्यास वाढीव सहा महिन्यांची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे.
पप्पूला शिक्षा जाहीर होताना न्यायालयाच्या आवारात जमलेले त्याचे समर्थक हादरून गेले. शिक्षा सुनावल्यानंतर पप्पूने न्यायालयाला आपणास फाशीची शिक्षा द्यावी, अशी विनंती केली. मात्र, न्यायालयाने ती मान्य केली नाही. या वेळी तो निर्विकार चेहरा करून होता. शिक्षा सुनावल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयाबाहेर आणले, तेव्हा आवारात उभ्या असलेल्या समर्थकांनी पप्पूला भेटण्यासाठी गलका केला. या वेळी समर्थकांना रोखण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
 मंगळवारी शिक्षा सुनावताना याप्रकरणी ठपका ठेवण्यात आलेले रिचर्ड, डॉ. नरेंद्र यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या आरोपींवर गुन्ह्य़ाचा कट रचणे, खून करणे असे आरोप होते. पप्पूसह बच्ची, बाबा, मोहमद यांनाही जन्मठेप सुनावण्यात आली. पप्पू कलानीवर २५ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकील विकास पाटील शिरगावकर यांनी न्यायालयापुढे शनिवारी केली होती. न्यायाधीश राजेश्वरी बापट-सरकार यांनी मंगळवारी पप्पूबाबत सकाळीच निर्णय देऊन दिवसभराच्या चर्चेला पूर्णविराम दिला. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचे पप्पूच्या वकिलांनी सांगितले.
राजकीय कारकीर्द
पप्पू कलानीने उल्हासनगरावर तीन दशके आपली मांड बसविली. टाडाखाली अटक झाल्यानंतर पत्नी ज्योती कलानी यांनी ‘उल्हासनगर पीपल्स पार्टी’ स्थापन केली.  तुरुंगात राहूनही पप्पू आमदार म्हणून निवडून यायचा. कालांतराने त्याचा राजकीय करिश्मा कमी होऊ लागला. काही वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकीत सत्ता गमवावी लागल्यानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कुमार आयलानी यांनी पप्पूला पराभवाचा धक्का दिला. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतही त्याच्या पत्नीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसावे लागले.

हत्याप्रकरण
२७ एप्रिल १९९० रोजी कामावर जात असताना इंदर भटिजा यांची त्यांच्या अंगरक्षकाकडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पप्पू कलानी, बच्ची पांडे, बाबा गाब्रियाल, रिचर्ड, मोहम्मद अरसद आणि डॉ. नरेंद्र रामसिंघानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे सर्व आरोपी जामिनावर मुक्त होते. उच्च न्यायालयाने गेली २३ वर्षे सुरू असलेला हा खटला निकालात काढण्याचे आदेश स्थानिक न्यायालयाला दिले होते.

उल्हासनगरमधील रक्तरंजित पर्व
* १० जुलै १९८६ पप्पू कलानी उल्हासनगरचे नगराध्यक्ष. १० जानेवारी १९९३ पप्पू कलानीची नगराध्यक्षपदाची मुदत संपली.
* ५ जून ८६ रिक्षा संघटनेचे रमेश चव्हाणांची हत्या.
* १ जुलै १९८८ मनोज पमनानी यांची हत्या.
* ८ एप्रिल १९८९ दुनिचंद कलानी यांची हत्या.
* २३ ऑगस्ट १९८९ लालुबाई हेमदेव यांची हत्या.
* २७ फेब्रुवारी १९९० घनश्याम भटिजा यांची हत्या.
* २८ एप्रिल १९९० इंदर भटिजा यांची हत्या.
* १५ ऑक्टोबर १९९० अण्णा शेट्टी यांची हत्या.
* २१ फेब्रुवारी १९९२ बबन कोयंडे हत्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2013 at 01:02 IST

संबंधित बातम्या