राणीच्या बागेत पक्ष्यांसाठी नंदनवन

येथे पूर्वीपासूनच संग्रही असलेल्या पक्ष्यांना नैसर्गिक अधिवास  उपलब्ध करून देण्यात आला असून त्यामुळे पर्यटकांनाही पक्ष्यांच्या नैसर्गिक दिनक्रमाचा अनुभव घेता येतो.

नैसर्गिक अधिवासात स्वच्छंद विहार करता येणार

नमिता धुरी

मुंबई : देशविदेशातील विविध प्रकारचे पक्षी, त्यांचा अधिवास, खाद्य यांविषयी माहिती करून देत असतानाच त्यांच्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्याना’त (राणीची बाग) ‘पक्ष्यांचे नंदनवन’ उभारण्यात आले आहे. येथे पूर्वीपासूनच संग्रही असलेल्या पक्ष्यांना नैसर्गिक अधिवास  उपलब्ध करून देण्यात आला असून त्यामुळे पर्यटकांनाही पक्ष्यांच्या नैसर्गिक दिनक्रमाचा अनुभव घेता येतो.

 राणीच्या बागेत पूर्वीपासूनच विविध प्रजातींचे पक्षी आहेत; मात्र त्यांना पुरेसा नैसर्गिक अधिवास उपलब्ध होत नव्हता. टाळेबंदीत राणीची बाग पर्यटकांसाठी बंद होती. या काळात पक्ष्यांसाठी अधिक सुशोभित व अधिक सुरक्षित नैसर्गिक अधिवास निर्माण करण्यात आला. प्रत्येक पक्ष्याचे चित्र, तो कोठे आढळतो, त्याचे खाद्य इत्यादी माहिती येथे लावण्यात आली आहे. तसेच पोपट, मुनिया, मैना या पक्ष्यांना पाळीव प्राणी म्हणून पिंजऱ्यात ठेवणे हा वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा असल्याचा संदेश देण्यात आला आहे. उपद्रवी जिवांचा संहार करून निसर्ग स्वच्छ ठेवण्यात व बीजप्रसार करण्यात पक्ष्यांची भूमिका काय असते, याचीही माहिती देण्यात आली आहे.  पक्ष्यांना नैसर्गिकरीत्या आपले खाद्य मिळवता  यावे यासाठी काही फळझाडेही लावण्यात आली आहे.  झाडाच्या ढोलीप्रमाणे काही कृत्रिम घरटी उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतात पक्षी सर्वेक्षणाची सुरुवात करणारे पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली यांची माहिती येथे देण्यात आली आहे.

दरम्यान, कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राणीची बाग पर्यटकांसाठी १ नोव्हेंबरला खुली करण्यात आली. तेव्हापासून येथे प्राणी-पक्षी दर्शनासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. विशेषत:  सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठय़ा संख्येने येते येत आहेत. प्राणीसंग्रहालय सुरू झाल्यानंतर पहिल्या१० दिवसांत ५० हजार पर्यटकांनी येथे भेट दिली आहे.

या पक्ष्यांचा समावेश

आपले भक्ष्य अख्खे गिळणारा ‘धनेश’ (हॉर्नबिल), गळय़ाभोवती लाल पट्टा असलेला आणि लांबलचक शेपटीचा ‘करण पोपट’, भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची मादी म्हणजेच ‘लांडोर’, इत्यादी भारतीय पक्षी येथे आहेत. पांढऱ्या व राखाडी रंगाचे सहज मैत्री करणारे ‘कॉकीटल’ हे ऑस्ट्रेलियन पक्षी, ‘राखाडी पोपट’ हा मूळचा आफ्रिकी व ४० ते ६० वर्षांचे दीर्घायुष्य असलेला एकमेव पक्षी, उडण्याऐवजी आपला बहुतांशी वेळ जमिनीवर घालवणारे ‘सोनेरी तीतर’ हा चिनी पक्षी असे परदेशी पक्षीही येथे पाहता येतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Paradise birds queens garden ysh

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या