मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची लीलावती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालकपदावरुन अचानक उचलबांगडी करण्यात आली आहे. सिंग यांनी माजी विश्वस्तांविरोधात कथित १२०० कोटींच्या घोटाळ्याबाबत वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आपण या कारवाईला सक्षम यंत्रणेपुढे आव्हान देऊ असे सिंग यांनी स्पष्ट केले आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कथित स्काॅर्पिओ आणि मनसुख हिरेन याची हत्या झाल्याचे प्रकरण बाहेर येताच तत्कालीन सरकारने परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केली. त्यानंतर लगेच सिॅग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप केला. तसे पत्र त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले. त्यामुळे देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला व नंतर गुन्हा दाखल होऊन तुरुंगात जावे लागले. या विरोधात सिंग यांच्याविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना निलंबितही व्हावे लागले. तत्कालीन महायुती सरकारने त्यांचे निलंबन रद्दही केले.

पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांची जुलै २०२४ मध्ये लीलावती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. या काळात माजी विश्वस्तांनी केलेला घोटाळा त्यांनी उघड केल्याचा दावा केला होता. या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर लगेचच तडकाफडकी त्यांची कार्यकारी संचालकपदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे.

सिंग यांच्या कार्यकारी संचालकपदाची मुदत पाच वर्षे होती. त्याआधीच त्यांना पदच्युत व्हावे लागले आहे. मात्र आपण या निर्णयाला आव्हान देऊ, असे त्यांनी सांगितले.

लीलावती रुग्णालयातील आजी-माजी विश्वस्तांच्या कथित घोटाळ्याबाबत गेले काही वर्षांपासून चर्चा सुरु आहे. विश्वस्तांच्या दोन गटातील वादामुळे गेले काही वर्षे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. ज्या विश्वस्तांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली, त्यांनीही सिंग यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

परमबीर सिंग यांनी ठाणे पोलीस आयुक्तपद, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक अशी पदेही भूषविली आहेत. धडाडीचे अधिकारी म्हणून ते ओळखले जातात. मात्र निवृत्तीच्या शेवटच्या वर्षांत त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल प्रचंड टीका झाली. त्यांच्यावरील खंडणीचे गुन्ह्यांचा तपास केंद्रीय गुप्तचर विभागाकडे सोपविल्यानंतर तो बंद करण्यात आला.