मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, परमबीर सिंह नेमके कुठे आहेत, याचा ठावठिकाणा अद्याप समजलेला नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकलेली नाही. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान आज राज्य सरकारने परमबीर सिंह यांच्यावरच्या कारवाईसंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. यासंदर्भात परमबीर सिंह याच्यावर कारवाई न करण्याचं आश्वासन आता पाळलं जाण्याची शाश्वती देता येणार नाही, असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्यावर कारवाई करण्याची तयारी राज्य सरकारने पूर्ण केल्याचं यातून स्पष्ट झालं आहे.

परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या आरोपांनंतर या प्रकरणावर मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर खुद्द परमबीर सिंह यांच्यावर देखील अनेक आरोप झाले. त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यासंदर्भात सुनावणी सुरू आहे. मात्र, परमबीर सिंह यांच्याविरोधात समन्स बजावून देखील ते अद्याप समोर आलेले नसल्यामुळे परमबीर सिंह बेपत्ता असल्याचा निष्कर्ष राज्य सरकारने न्यायालयासमोर मांडला आहे.

“परमबीर सिंह नेमके कुठे आहेत, याविषयी अद्याप कोणतीही माहिती नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई न करण्याचं दिलेलं आश्वासन राज्य सरकारला पाळता येणार नाही”, अशी भूमिका राज्य सरकारने मांडली आहे. मात्र, परमबीर सिंह यांची बाजू कोर्टासमोर मांडणारे वकील महेश जेठमलानी यांनी मात्र, “त्यांना अजून फरार घोषित करण्यात आलेलं नाही”, असं यावेळी सांगितलं आहे.