मुंबई : मुंबई महानगरपालिकेला उच्च न्यायालयाने कचऱ्याच्या समस्येवरून फटकारल्यानंतर पालिकेने स्वच्छतेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. प्लास्टिकच्या बाटल्यांचं संकलन करण्यासाठी महापालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयाने अनोखा उपक्रम हाती घेतला असून बास्केट बॉल संकल्पनेच्या कचरापेट्या बसवण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी या उपक्रमात सामावून घेण्यात येणार असल्याने परळमधील सात शाळांमध्ये हा प्रयोग करण्यात येत आहे.
कचरा व्यवस्थापनावरून उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला गेल्या काही दिवसात अनेकदा फटकारले. त्यामुळे पालिकेने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरभर दृश्यमान स्वच्छता अधिक प्रभावी करण्यासाठी व्यापक कृती आराखडा राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून २२७ नगरसेवकांना पत्र पाठवून आपल्या प्रभागात नागरिकांचा सहभाग वाढविणे, स्वच्छता मोहिमेला सक्रिय सहकार्य करणे आणि वारंवार कचरा टाकण्यात येत असलेली ठिकाणे कायमस्वरूपी हटविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच कचऱ्याचे वर्गीकरण, ओल्या कचऱ्यावर जागेवर प्रक्रिया करणे या मुद्द्यावरही भर देण्यात येत आहे.
विविध पातळ्यांवर कचरा व्यवस्थापन करताना एफ दक्षिण विभागात ‘प्लास्टिक बाटली संकलन मोहीम राबवण्यात येणार आहे. ही मोहीम अधिक आकर्षक करण्यासाठी ‘बास्केटबॉल संकल्पना’ उपक्रम राबविण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांना वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या कचऱ्यात टाकण्याऐवजी त्या वेगळ्या संकलित करून निश्चित ठिकाणी जमा करण्यास प्रोत्साहित करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
सात संकलन पेट्या प्लास्टिकने भरल्या
या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थी रिकाम्या बिसलेरी व इतर प्लास्टिकच्या बाटल्या शाळेत आणून बास्केटबॉल संकल्पनेतील वैशिष्ट्यपूर्ण कचरापेट्यांमध्ये टाकत आहेत. या उपक्रमामुळे ७ संकलन बिन्स पूर्णपणे प्लास्टिक बाटल्यांनी भरल्या असून, या बाटल्या नियमित कचरा प्रवाहात जाण्यापासून रोखण्यात यश आले आहे, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
संकल्पना अशी
मुंबई महानगरपालिकेच्या सात शाळांमध्ये बास्केटबॉल संकल्पनेवर आधारित विशेष प्लास्टिक बाटली संकलन कचरापेट्या प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात आल्या आहेत. मुले उंच उडी मारून बास्केट बॉलच्या जाळीत बाटली टाकतात, मग ही बाटली थेट कचरा पेटीत पडते अशी ही संकल्पना आहे. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून प्लास्टिक बाटल्यांचे वर्गीकरण करणे व संकलन वाढविणे आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणे याकरीता हा उपक्रम राबवण्यात आला आहे. बास्केटबॉल संकल्पनेमुळे प्लास्टिक बाटली संकलन प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी अधिक रंजक, आकर्षक आणि सहभागात्मक झाली आहे.
