मुंबई : पैशांसाठी आईनेच १५ वर्षांच्या मुलीला वेश्याव्यवसायात ढकलले, तसेच सावत्र वडील व रिक्षा चालकाने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी आरोपी आई वडिलांसह तिघांना अटक केली आहे. मुलीच्या तक्रारीवरून आरोपींंविरोधात बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण(पोक्सो) कायदा व अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुलीच्या तक्रारीनुसार, पीडित मुलीच्या आईने २८ वर्षीय व्यक्तीशी दुसरे लग्न केले आहे. तिच्या सावत्र वडिलांनी आठ महिन्यांपूर्वी पीडित मुलीवर सर्वप्रथम लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर आरोपीने अनेकवेळा तिच्यावर अत्याचार केला आहे. तसेच पीडित मुलीच्या आईने तिला वेश्याव्यवसायात ढकलले होते. गेल्या आठ महिन्यांपासून आरोपी महिला तिच्या मुलीला मिरा रोड येथे वेश्या व्यवसायासाठी पाठवत होती. तेथून मिळणारी रक्कम पीडित मुलीची आई घ्यायची. तक्रारीनुसार, आरोपी महिला मुलीला मिरारोड येथील विविध हॉटेलमध्ये पाठवायची.
त्यासाठी तिला कांदिवली परिसरातून नेण्यासाठी एक रिक्षा चालक यायचा. ५५ वर्षीय आरोपी रिक्षा चालकानेही अनेकवेळा तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून सावत्र वडील, मुलीची आई व आरोपी रिक्षा चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर राहत्या परिसरातून तिघांनाही अटक करण्यात आली.