मुंबई : सीबीएसई, आयसीएसई या केंद्रीय शिक्षण मंडळांच्या शाळा आणि इंटरनॅशनल स्कूलमधील प्रवेश क्षमतेला मागे टाकत यंदा मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाल्याचे चित्र आहे. आतापर्यंत सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांनी पालिका शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे.

महापालिकेने सुरू केलेले इंग्रजी माध्यम, सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या शाळा, शाळांच्या इमारतींची डागडुजी, पायाभूत सुविधांसह अन्य शैक्षणिक सोयींमधील लक्षणीय सुधारणा आणि दैनंदिन शैक्षणिक कामकाजात विद्यार्थीस्नेही उपक्रमांचा समावेश यामुळे पालकांनी महापालिकेच्या शाळांना प्राधान्य दिल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पालकांनी पालिका शाळांना प्राधान्य देण्यामागे खासगी शाळांची भरमसाट शुल्कवाढ हेही एक कारण असल्याचे सांगितले जाते.  

पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची घटणारी संख्या हा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय होता. घटत्या पटसंख्येमुळे अनेक शाळा बंद कराव्या लागतील अशी भाकीते करण्यात येत होती. मात्र आता चित्र पालटत असून पालिका शाळांना पालक पसंती देत आहेत.

टाळेबंदीनंतर सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षांत पालिकेच्या शाळांमध्ये २९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यावर्षीही विद्यार्थ्यांचा ओघ अधिक आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेश प्रक्रिया जुलैपर्यंत चालणार असल्याने विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

पालिकेमार्फत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा आठ भाषिक माध्यमांच्या शाळा चालवल्या जातात. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सुमारे १,१५० शाळांमध्ये सध्या तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिकेतर्फे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक वस्तू मोफत दिल्या जात असूनही विद्यार्थ्यांची घटती संख्या हा चिंतेचा विषय होता. ही चिंता दूर करण्यासाठी शिक्षण विभागाने अनेक प्रयोग केले. आभासी वर्ग (व्हच्र्युअल क्लासरूम) सुरू केले. विद्यार्थ्यांना मोफत टॅब दिले. सीबीएसई, आयसीएसई मंडळांशी शाळा संलग्न करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी आयबी आणि केंब्रीज या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांशी करार करण्यात आला. त्यामुळे यंदा नव्या एक लाख विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दीष्ट पालिकेच्या शिक्षण विभागाने ठेवले आहे.

प्रवेश क्षमतेत वाढ

पालिकेच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळांना मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन या शाळांमध्ये यावर्षी आणखी ९६० जागा वाढवण्यात आल्या आहेत. नर्सरी आणि छोटा शिशु (ज्युनिअर केजी) या वर्गासाठी प्रत्येकी एक अतिरिक्त तुकडी वाढवण्यात आली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून सुरू होणाऱ्या आयबी आणि केंब्रीज मंडळाच्या शाळांसाठीही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

चित्र का पालटले?

पालिका शाळांच्या इमारती, अभ्यासक्रम, शैक्षणिक आणि पायाभूत सुविधा, अभ्यासाव्यतिरिक्त इतर उपक्रम यात आमूलाग्र सुधारणा करण्यात आल्या. सीबीएसई आणि आयसीएसई शाळा सुरू करण्यात आल्या. केंब्रीज आणि आयबी या आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थांशी शैक्षणिक करार करण्यात आले. याचा एकत्रित परिणाम म्हणून पालिका शाळांमध्ये प्रवेशासाठी चढाओढ लागली आहे.

इंग्रजीला सर्वाधिक पसंती : यंदा सर्वाधिक विद्यार्थानी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. त्याखोलाखाल मराठी, हिंदी, उर्दू या शाळांना पसंती दिली आहे. सीबीएसई, आयसीएसई आणि इंटरनॅशनल स्कूलमधील प्रवेश क्षमतेच्या तुलनेत दुप्पट प्रवेश पालिकेचा शाळांमध्ये झाले आहेत.

विभागनिहाय प्रवेश

प्राथमिक : १७,२८७

माध्यमिक : १८,०३५

एकूण प्रवेश : ३५,३२२

पसंती अशी.. 

* इंग्रजी : १३,६८१

*  मराठी : ८,०७९

*  हिंदी : ६,९८४

*  उर्दू : ६,०३९