scorecardresearch

मुंबई: ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकेतील पाच स्थानकांवर आता वाहनतळाची सुविधा

मागाठाणे, ओशिवरा, गोरेगाव पश्चिम, मालाड पश्चिम आणि बोरिवली पश्चिम या पाच मेट्रो स्थानकांजवळ मेट्रो प्रवाशांसाठी वाहनतळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

metro
(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

प्रवाशांना मोठा दिलासा, परवडणाऱ्या दरात सेवा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) तसेच महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवरील पाच मेट्रो स्थानकांवर वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मेट्रो प्रवाशांसाठी ही वाहनतळे दिलासा ठरणार आहेच. मेट्रो स्थानकाजवळ दुचाकी, चारचाकी वाहने उभी करून पुढील मेट्रोने करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र या वाहनतळांमध्ये वाहने उभी करण्यासाठी प्रवाशांना पैसे मोजावे लागणार असून त्याचे दर परवडणारे असल्याचा दावा करण्यात आला आहे.
दोन नव्या मेट्रो मार्गिकेमुळे दहिसर – अंधेरी पश्चिम आणि दहिसर – गुंदवली (अंधेरी पूर्व) प्रवास अतिजलद होत आहे. या मार्गिकेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. मेट्रो स्थानकांपर्यंत पोहचण्यासाठी बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सी वा इतर पर्यायांवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे अनेक जण मेट्रोने प्रवास करणे टाळतात. मात्र आता वाहनतळाची सुविधा उपलब्ध करण्यात आल्यामुळे स्वतःच्या खासगी वाहनाने मेट्रो स्थानकापर्यंत जाणे प्रवाशांना सोयीचे ठरणार आहे. दुचाकी, चारचाकी वाहन मेट्रो स्थानकानजिक उभी करून पुढील प्रवास मेट्रोने करता येणार आहे. एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएलने बेस्टच्या मदतीने वाहनतळाची सुविधा उपलब्ध केली आहे. मेट्रो स्थानकाच्या जवळील बेस्ट बस आगारात वाहनतळाची सुविधा असणार आहे.

हेही वाचा >>>मुंबई: राज्यात ‘एच ३ एन २’चे ४७ चे नवे रुग्ण

मागाठाणे, ओशिवरा, गोरेगाव पश्चिम, मालाड पश्चिम आणि बोरिवली पश्चिम या पाच मेट्रो स्थानकांजवळ मेट्रो प्रवाशांसाठी वाहनतळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. एकूण ४८३ वाहने उभी करता येतील अशी व्यवस्था आहे. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देत त्यांचा मेट्रो प्रवास सुकर करण्यावर एमएमआरडीए आणि एमएमओपीएलकडून भर दिला जात आहे. त्याचाच भाग म्हणून आता वाहनतळ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी सांगितले.

कुठे किती वाहने उभी करता येणार
मागाठाणे-१२६ वाहने
ओशिवरा-११५ वाहने
गोरेगाव (प)-११६ वाहने
मालाड (प.) -८६ वाहने
बोरिवली पश्चिम- वझिरा नाका) -४० वाहने

किती तासासाठी किती शुल्क
पहिल्या तीन तासासाठी दुचाकीला २० रु, चारचाकीला ३० रु. तर बससाठी ६० रु. असे दर आहेत.
त्यानंतर पुढील सहा तासासाठी दुचाकीला २५ रु, चारचाकीला ४० रु. तर बससाठी ९५ रु. असे दर आहेत. तर पुढे बारा तास वा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठीची सुविधाही आहे.
म्हत्त्वाचे म्हणजे महिन्याभराची सुविधाही मासिक पासच्या माध्यमातून येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 22:56 IST
ताज्या बातम्या