लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : ‘लोकसत्ता’चे माजी संपादक दिवंगत माधव गडकरी यांच्या स्मारकाची सध्या अत्यंत दुरवस्था झाली आहे. विलेपार्ले पूर्व येथे असलेले हे स्मारक महापालिकेने बांधलेले असून या स्मारकातील लेखणीची प्रतिकृती आणि नामफलक गायब झाल्याने त्याची रया गेली आहे.

विलेपार्ले पूर्व येथील हनुमान मार्गावरील नवप्रभा गृहनिर्माण संस्थेत गडकरी यांचे निवासस्थान होते. त्यांच्या कर्तृत्वाचा मरणोत्तर सन्मान म्हणून विलेपार्लेतील चौकाला गडकरी यांचे नाव द्यावे यासाठी ‘पार्ले पंचम’ या सांस्कृतिक संस्थेने स्वाक्षरी मोहीम राबवली.
यात पार्लेकरांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर तत्कालीन पालिका आयुक्तांना भेटून चौकाच्या नामकरणाबाबत विनंती करण्यात आली.
स्थानिक नगरसेवकाच्या पुढाकाराने गडकरी यांचे स्मारक पाल्र्याच्या चौकात उभे राहिले. तीन ग्रंथ, त्यावर दौत आणि लेखणी असे या स्मारकाचे स्वरूप आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून यातील लेखणी आणि नामफलक गायब झाला आहे. स्मारकाखालील हिरवळही नाहीशी झाली आहे.

‘मध्यंतरीच्या काळात नगरसेवक बदलल्याने अनेक संदर्भ बदलले. पण संदर्भ बदलले तरी व्यक्तीच्या कामाचे महत्त्व कमी होत नाही. त्यामुळे स्मारकाच्या दुरवस्थेबाबत पालिकेत तक्रार करणार आहे. पालिकेने लक्ष न दिल्यास लोकसहभागातून स्मारक पूर्ववत करू’, असे पार्ले पंचमचे श्रीधर खानोलकर यांनी सांगितले.

पार्ल्यात एका अमराठी व्यापाऱ्याच्या आईचे स्मारक बांधताना बराच उत्साह दाखवला गेला. मात्र, पु. ल. देशपांडे यांच्या नावे उभारलेले उद्यान न्यायालयाच्या आदेशाचे कारण सांगून बंद करण्यात आले. अशाप्रकारे पार्ल्यात मराठी माणसाची उपेक्षा होत असल्याची खंत खानोलकर यांनी व्यक्त केली.

स्मारकाच्या दुरवस्थेबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. स्मारकाची पाहणीही झाली आहे. स्मारक पूर्ववत करून त्याचे सौंदर्यीकरण करण्याचे काम लवकरच हाती घेतले जाईल.
– प्रशांत सपकाळे, साहाय्यक पालिका आयुक्त, के पूर्व विभाग