मुंबई : प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मच्या मरिन लाईन्स आणि पालघर येथील आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने छापा घातला. या छाप्यामध्ये अन्नसुरक्षा व स्वच्छतेसंदर्भातील अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याने एफडीएने मरिन लाईन्स येथील आस्थापनेचा एफएसएसएआय परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. तसेच पालघर येथील आस्थापनावर केलेल्या कारवाईमध्ये ३२ लाखांचा साठा जप्त केला. या कारवाईदरम्यान कुकिंग देसी काऊ बटर, मलई पनीर, कोलोस्ट्रम, फिग्स, मलई कुल्फी, स्वीट मावा, तसेच गायीचे आणि म्हशीचे तूप या अन्नपदार्थांचे एकूण नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले.
मुंबईतील मरिन लाईन्स येथील पारशी डेअरी फार्म प्रा. लि. येथील आस्थापनेची १४ जुलै रोजी तपासणी केली. या तपासणीमध्ये विविध तरतुदींचे गंभीर उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. तपासणीनंतर सादर करण्यात आलेल्या अहवालाच्या आधारे पदनिर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त (अन्न) १५ जुलै रोजी परवाना निलंबनाचा आदेश जारी केला.
तपासणीदरम्यान आढळलेल्या प्रमुख त्रुटींमध्ये कच्च्या दुधाच्या स्वीकारासाठी संरक्षित कक्ष नसणे, साठवण कक्ष व उत्पादन विभागातील भिंतींवर बुरशीची वाढ, कच्चा माल थेट जमिनीवर साठविणे, बुरशीग्रस्त भिंतीलगत कच्चा माल ठेवणे, उत्पादन विभागात अस्वच्छता, माशांचा मोठ्या प्रमाणात वावर, कीटक व उंदीर प्रतिबंधक जाळ्यांचा अभाव, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा नसणे, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय नोंदी अपूर्ण असणे, योग्य सुरक्षात्मक पादत्राणे उपलब्ध नसणे, वाहन स्वच्छतेच्या नोंदी उपलब्ध नसणे तसेच अनेक अन्नपदार्थांवर वापर कालावधी, मुदत समाप्तीची तारीख यांसारखी अनिवार्य माहिती नसणे अशा गंभीर बाबींचा समावेश आहे. या त्रुटींमुळे अन्नाचे सूक्ष्मजीवजन्य दूषितीकरण होण्याचा तसेच ग्राहकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. त्यामुळे व्यापक जनहित व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापनेचा परवाना १५ जुलैपासून पुढील आदेशापर्यंत तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. निलंबन कालावधीत संबंधित आस्थापनेला अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, विक्री किंवा वितरण करण्यास मनाई करण्यात आली असून आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे पारशी डेअरीचे उत्पादन हे पालघर येथे होत असल्याने तेथे ही १४ जुलै रोजी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये ३२ लाख ११ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला. या कारवाईदरम्यान कुकिंग देसी काऊ बटरचे ३१ लाख ११ हजार ८१ रुपयाचे ५ हजार ९९९ किलोग्रॅम माल जप्त केला. तसेच ५ हजार ७०० रुपयांचे ७.५ किलोचे सैल पनीर तसेच उत्पादवर माहिती नसल्याने ९३ हजार ९६० रुपयांचे ८७ किलोचे कोलोस्ट्रम असे तब्बल ३२ लाख १० हजार ७४१ रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. मलई पनीर, कोलोस्ट्रम, फिग्स, मलई कुल्फी, स्वीट मावा, गायीचे आणि म्हशीचे तूप या अन्नपदार्थांचे एकूण आठ नमुने पुढील विश्लेषणासाठी घेण्यात आले. सदर अन्नपदार्थ भ्रामक लेबलिंग तसेच विहित दर्जानुसार नसल्याचा संशय आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.
गोरेगावमध्ये ५५८ लिटर दूध नष्ट
गोरेगाव पश्चिमला पहाटे ४ वाजता गुन्हे शाखा आणि एफडीएने संयुक्तरित्या कारवाई केली. या कारवाईमध्ये दूधाच्या पिशव्यांमध्ये छेडछाड करून विक्री करत असल्याप्रकरणी कृष्णा लिंगमपल्ली (४८) व रवी पाटीकाका (४५) यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये ५५८ लिटर दुधाचा साठा नष्ट केला. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे.
गोवंडीमध्ये १ हजार ६८३ लिटर दूध नष्ट
गोवंडी येथील मेसर्स सूफी डेअरीची १५ जुलै रोजी केलेल्या तपासणीत अन्न व्यवसायिकाकडून स्टेनलेस स्टील मिल्क चिलिंग टँकमध्ये तसेच प्लास्टिकच्या पिशव्या व कॅनमध्ये सैल पाश्चराईज्ड म्हशीचे दूध साठवून त्याची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये १ लाख ७ हजार ७१२ रुपयांचे १ हजार ६८३ लिटर दूध नष्ट करण्यात आले. म्हशीच्या सैल दुधाचा एक नमुना प्रयोगशाळीय विश्लेषणासाठी घेण्यात आला.
मुलुंडमध्ये ६१.२५ किलोचे दुग्धजन्य पदार्थ जप्त मुलुंड (पश्चिम) येथील मेसर्स अग्रवाल एंटरप्रायझेसवर केलेल्या कारवाईमध्ये डाईस्ड चीज ब्लेंड, डाईस्ड मोझरेला चीज, बर्फी, तसेच पनीर असा एकूण ६१.२५ किलोचा साठा जप्त केला. याची किंमत अंदाजे १९,७५९ इतकी होती. या अन्नपदार्थांवर उत्पादन दिनांक, वापरण्याची अंतिम तारीख व बॅच क्रमांक नमूद नसणे, तसेच लेबलिंग नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. याशिवाय, विक्रीसाठी ठेवलेले सैल पनीर हे प्रत्यक्षात चीज ॲनालॉग असण्याची शक्यता असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
