साध्या डोळ्यांनीही पाहता येणार 

येत्या सोमवारी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी (७ ऑगस्ट) खंडग्रास चंद्रग्रहण असून मुंबईसह संपूर्ण भारतातून दिसणार आहे. चंद्रग्रहण असले तरी या दिवशी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे सण साजरे करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे ज्येष्ठ पंचांगकत्रे व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनी ( मुंबई ) चंद्रोदय होईल. त्या वेळी चंद्रिबब ९९.६ टक्के प्रकाशित दिसेल. रात्री १० वाजून ५२ मिनिटानी खंडग्रास चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. रात्री ११ वाजून ५१ मिनिटांनी ग्रहणमध्य होणार असून चंद्रिबबाचा २४.६ टक्के भाग पृथ्वीच्या छायेत येईल. त्यानंतर ग्रहण सुटण्यास प्रारंभ होईल. रात्री १२ वाजून ४९ मिनिटांनी संपूर्ण चंद्रिबब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडेल व चंद्रग्रहण सुटेल. हे चंद्रग्रहण साध्या डोळ्यानी पाहता येणार आहे. या दिवशी चंद्र पृथ्वीपासून ३ लाख ९४ हजार ७७० किलोमीटर अंतरावर असणार आहे. हे चंद्रग्रहण भारताप्रमाणेच संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, यूरोप आणि पश्चिम पॅसिफिक महासागरातून दिसणार असल्याचे सोमण यांनी सांगितले.

यंदा श्रावण अमावास्येला (सोमवार २१ ऑगस्ट) रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे; परंतु ते ग्रहण भारतातून दिसणार नाही. हे खग्रास सूर्यग्रहण हवाई, उत्तर पूर्व पॅसिफिक महासागर , उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा उत्तरेकडील भाग, यूरोपचा अतिपश्चिमेकडील भाग आणि पश्चिम आफ्रिका येथून दिसेल. अमेरिकेच्या मोठय़ा भागातून या सूर्यग्रहणाची ‘खग्रास स्थिती’ दिसणार आहे. पुढच्या वर्षी बुधवार, ३१ जानेवारी २०१८ रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार असल्याची माहितीही सोमण यांनी दिली.