मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी मुंबई महापालिका मुख्यालयात येणार आहेत. पार्टिसिपेट मुंबई या प्रकल्पाचे लोकार्पण आणि मुंबई महानगरपालिका – समग्र संस्था यांच्यात सर्वसमावेशक करार देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महानगरपालिका सभागृहात होणार आहे. कार्यक्रमाला उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, पालकमंत्री ॲड. आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत.

कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून विविध उपक्रमासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पार्टिसिपेट मुंबई हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. महानगराच्या विकासासाठी उपलब्ध असलेल्या प्रत्येक प्रकारच्या क्षमतेला योग्य दिशा मिळणे हीच या उपक्रमाची खरी ताकद आहे. त्यामुळे शहराच्या विकासाच्या दृष्टीने अधिकाधिक नागरिक, संस्था, कंपन्या, कॉर्पोरेट क्षेत्राने आपले योगदान देण्याचे, आवाहन मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले.

पार्टिसिपेट मुंबई व्यासपीठ एकात्मिक व्यासपीठ (वन स्टॉप प्लॅटफॉर्म) म्हणून कार्य करेल. महानगरपालिकेच्या ४५० हून अधिक प्रकल्पांची आणि गरजाची माहिती येथे उपलब्ध असेल आणि इच्छुक भागीदारांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रानुसार योग्य उपक्रमाशी जोडण्याची संधी मिळेल. या सहभागाचे स्वरूप केवळ आर्थिक योगदानापुरते मर्यादित न राहता तंत्रज्ञान, तज्ज्ञ ज्ञान, कौशल्य, साहित्य, उपकरणे, सेवा, स्वयंसेवी सहभाग आणि अंमलबजावणी सहकार्य अशा अनेक स्वरूपात असू शकेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

‘पार्टिसिपेट मुंबई’ प्रकल्प

मुंबईच्या विकासात शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसोबतच उद्योगजगत आणि समाजाच्या सहभागाला अधिक संघटित, पारदर्शक आणि परिणामाभिमुख स्वरूप देणे हा पार्टिसिपेट मुंबई उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. सद्यस्थितीत ‘पार्टिसिपेट मुंबई’ उपक्रमांतर्गत नोंदविलेल्या नागरी प्रकल्पांचे एकूण मूल्य तब्बल १८० कोटी रूपयांहून अधिक आहे. सध्या ४५० हून अधिक थेट खुले प्रकल्प सहभागासाठी उपलब्ध असून, खूप कमी कालावधीत उद्योगजगतातील २७ सीएसआर भागीदारांसह २३ स्वयंसेवी संस्था, ५६ सक्षम अंमलबजावणी भागीदार तसेच ५०० हून अधिक स्वयंसेवक या नागरी परिवर्तनाच्या उपक्रमाशी सक्रियपणे जोडले गेले आहेत.

‘पार्टिसिपेट मुंबई’ हे मुंबई महानगरपालिकेच्या नागरी गरजा आणि समाज व उद्योग क्षेत्राकडे उपलब्ध असलेल्या ज्ञान, कौशल्य, तंत्रज्ञान, साहित्य, सेवा, मनुष्यबळ आणि नाविन्यपूर्ण कल्पना यांना जोडणारे डिजिटल एकखिडकी व्यासपीठ आहे. मुंबईच्या विविध भागांमध्ये शिक्षण, आरोग्य, उद्याने, पर्यावरण, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, नागरी पायाभूत सुविधा आणि इतर क्षेत्रांमध्ये असलेल्या गरजा अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी उपलब्ध सामाजिक व कॉर्पोरेट क्षमतांचा योग्य वापर करून घेण्याची व्यवस्था या माध्यमातून निर्माण करण्यात आली आहे.

या उपक्रमांतर्गत मुंबई महानगरपालिकेचे विविध विभाग त्यांच्या कार्यक्षेत्रातील आवश्यक प्रकल्प, नागरी गरजा आणि विकासात्मक संधी पोर्टलवर उपलब्ध करून देतील. कॉर्पोरेट संस्था, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, तज्ज्ञ आणि इतर इच्छुक भागीदार हे प्रकल्प पाहून आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या उद्दिष्टांनुसार, तांत्रिक क्षमता, अनुभव किंवा उपलब्ध संसाधनांनुसार संबंधित प्रकल्पासाठी सहभाग नोंदवू शकतील. त्यामुळे गरज असलेल्या नागरी प्रकल्पांपर्यंत योग्य भागीदार पोहोचण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि परिणामकारक होणार आहे.

‘पार्टिसिपेट मुंबई’ची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे या माध्यमातून केवळ महानगरपालिकेने सुचविलेल्या प्रकल्पांमध्येच सहभाग घेता येणार नसून, सहभागी संस्था मुंबईच्या नागरी विकासासाठी स्वतःच्या नाविन्यपूर्ण कल्पना, तंत्रज्ञानाधारित उपाय, सामाजिक उपक्रम किंवा नवीन प्रकल्प संकल्पनाही प्रस्तावित करू शकतील. अशा प्रस्तावांचे संबंधित विभागाकडून तांत्रिक व प्रशासकीय परीक्षण करून त्यांची उपयुक्तता, व्यवहार्यता आणि मुंबईच्या नागरी गरजांशी असलेला संबंध तपासण्यात येईल आणि त्यानंतर आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात येईल.

निधी स्वीकारणार नाही

‘पार्टिसिपेट मुंबई’मध्ये कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (CSR) निधी मुंबई महानगरपालिकेकडे स्वीकारला किंवा हस्तांतरित केला जाणार नाही. त्याऐवजी प्रत्यक्ष वस्तू, साहित्य, उपकरणे, तंत्रज्ञान, सेवा, तज्ज्ञ ज्ञान, कौशल्य, पायाभूत सुविधा, प्रकल्प अंमलबजावणीसाठी आवश्यक सेवा आणि स्वयंसेवी सहभाग अशा स्वरूपातील योगदानाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित संस्थांना त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या उद्दिष्टांनुसार प्रत्यक्ष नागरी परिणाम निर्माण करणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होता येईल आणि महानगरपालिकेलाही उपलब्ध असलेल्या अतिरिक्त तांत्रिक व सामाजिक क्षमतांचा उपयोग नागरी सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी करता येईल.