मुंबई : एकही दिवस वेळापत्रकाबरहुकूम न धावणाऱ्या लोकल रेल्वेच्या गाड्या, स्थानकांवरील असुविधा, वाढते अपघात, गर्दी यांमुळे मध्य रेल्वेचे प्रवासी भरडले जात आहेत. तर अपुरे मनुष्यबळ, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण यांपासून ते अगदी स्वच्छतागृहांसारख्या अत्यावश्यक सुविधेची कमतरता यांमुळे कर्मचारीही कारभारामुळे नाडले गेले आहेत. रेल्वेच्या या कारभाराला वैतागून आता कर्मचारी आणि प्रवाशांनीही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनद्वारे सोमवारी आंदोलन करण्यात आले. तर रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने २२ ऑगस्ट रोजी आंदोलन करणार आहे. रेल्वेच्या कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे प्रवाशांचा अमूल्य वेळ वाया जात आहे. कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब होतो. तर, रुग्णांना रुग्णालयात, विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाण्यास उशीर होतो. सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी लोकलऐवजी लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना प्राधान्य दिले जाते. असा आरोप रेल्वे प्रवासी संघटनांनी केला आहे. तर अपुऱ्या मनुष्यबळामुळे ताण येत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनद्वारे सोमवारी आंदोलन करण्यात आले. स्थानक व्यवस्थापकाच्या ६० टक्के रिक्त जागा थेट आरआरबीद्वारे आणि ४० टक्के जागा पदोन्नतीद्वारे भरल्या जातात. पदोन्नती, भरती प्रक्रिया पूर्णपणे रेल्वे प्रशासनाकडून पार पाडली जाते. मात्र, ही प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू असल्याने आणि ठोस कृती आराखडा प्रसिद्ध केला जात नसल्याने नियुक्त्या रखडल्या आहेत. तसेच महत्त्वाच्या, गर्दी आणि लोकल, रेल्वेगाड्यांची जास्त संख्येने ये-जा होते, अशा स्थानकात उपस्थानक व्यवस्थापकाची नियुक्ती करण्याचे निर्देश आहेत. मात्र मध्य रेल्वेवरील अनेक वर्दळीच्या स्थानकात उपस्थानक व्यवस्थापक पद रिक्त ठेवल्याने, स्थानक व्यवस्थापकांवर कामाचा भार वाढला आहे. गेल्या १० वर्षांमध्ये कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे रिक्त पदे भरणे आवश्यक असल्याचे मत ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. हेही वाचा - सलग सुट्टीच्या दिनी कोकणात धावणार विशेष रेल्वेगाडी मध्य रेल्वेवर रात्रकालीन ब्लाॅक घेतले जातात. मात्र या ब्लाॅकचे नियोजन ऐनवेळी होत असल्याने, याबाबतचा संदेश सायंकाळी पाच वाजेनंतर येतो. त्यामुळे ऐनवेळी पाॅइँट्स मॅन आणि इतर कर्मचाऱ्यांचा पाचारण करणे कठीण होते. त्यामुळे ब्लाॅकचे नियोजन वेळेआधीच करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. स्थानकांत प्राथमिक सुविधाही नाहीत महिला स्थानक व्यवस्थापकांना स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याची बाब समोर आली आहे. ज्या कार्यालयात पाचपेक्षा अधिक महिला आहेत, त्याठिकाणी स्वतंत्र स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. मात्र ही सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध नाही. मध्य रेल्वेवरील अनेक स्थानक व्यवस्थापक कार्यालयात वातानुकूलित यंत्रणा नसल्याने, विद्युत यंत्रणेची हानी होऊ शकते. स्थानक व्यवस्थापकाचे कार्यालय हे जुन्या पद्धतीने बांधलेले आहे. तेथे खेळती हवा नाही. परिणामी, जास्त तापमानामुळे विद्युत यंत्रणेत बिघाड होण्याची शक्यता असते. त्यामुळे वातानुकूलित यंत्रणा बसवणे आवश्यक आहे. अनेक स्थानकांत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. अशा समस्या आणि मागण्यांचे पत्र मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनने दिले आहे. हेही वाचा - मुंबई : जाहिरात धोरणाचा पालिकेच्या कार्यालयांनाच विसर, पश्चिम दृतगती मार्गावर रस्त्याच्या मध्येच जाहिरातीचे फलक प्रवाशांचे आंदोलन २२ ऑगस्ट रोजी रेल्वेच्या कारभाराचा प्रवाशांनी पांढरा पेहराव करून, काळी फिती बांधून २२ ऑगस्ट रोजी निषेध करावा, असे आवाहन रेल्वे प्रवासी संघटनेने केले आहे. मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. कोणत्याही प्रकारचे निषेध आंदोलन किंवा कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करू नये, जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी नोटीस ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षांना दिली आहे. रेल्वे प्रशासनाबरोबर वारंवार बैठका झाल्या. मात्र उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे उपनगरी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले. आम्ही रेल्वे प्रवाशांच्या हक्कांसाठी लढत आहोत. रेल्वे पोलीस नोटीस पाठवून दबाव निर्माण करत आहेत. मात्र, या दबावाला आम्ही न जुमानता आंदोलन होणार आहे, असे मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कटीयन यांनी सांगितले.