मुंबई : करोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी पुन्हा वाढली असून गर्दीचा फायदा घेऊन भुरटे चोर लोकलमध्ये हातसफाई करू लागले आहेत. कार्यालयातून थकूनभागून घरची वाट धरणाऱ्या प्रवाशांच्या वस्तू चोरण्याचे प्रकार वाढत आहेत. साधारण सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत चोऱ्या होत असल्याची बाब मध्य रेल्वे सुरक्षा दलाने केलेल्या अभ्यास अहवालातून समोर आली आहे.
मोबाइल चोरीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. लोकलच्या गर्दीतून प्रवास करताना, तसेच स्थानकातील पादचारी पुलावरून जाताना, फलाटावर उभे असताना प्रवाशाचा मोबाइल, पर्स किंवा अन्य वस्तू चोरीला जातात. काहीच दिवसांपूर्वी चोरांशी झालेल्या झटापटीत रेल्वेतून पडून दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. सायंकाळी गर्दीच्या वेळीच सर्वाधिक चोऱ्या होत असल्याचे मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरक्षा दलाने २०२१ मध्ये केलेल्या कारवाईत मोबाइलसह प्रवाशांच्या सामानाच्या चोरीच्या एकूण २,३०८ घटनांची नोंद झाली, त्यापैकी २६ टक्के म्हणजेच ६१० चोरीच्या घटना सायंकाळी ६ ते रात्री ९ दरम्यान घडल्या होत्या, अशी माहिती दिली.
चोरीच्या सर्वाधिक घटना सायंकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत घडल्या असून त्यात २५२ गुन्हे दाखल झाले आहेत, तर १९९ गुन्हे सायंकाळी ६ ते ७ दरम्यान घडले आहेत. दरम्यान, मध्य रेल्वेवरील लोकलमध्ये २०२१ मध्ये रात्री ८ ते ९ यावेळेत चोरीची १५९ प्रकरणे नोंदवली गेली. सकाळी गाडय़ांना जास्त गर्दी असली तरी चोरीच्या घटना तुलनेने कमी होत्या.
दुपारी चोरीचे प्रमाण कमी
• लोकलमध्ये २०२१ मध्ये सकाळी ९ ते १० दरम्यान चोरीचे एकूण १५३ घटना तर सकाळी ८ ते ९ दरम्यान ११३ घटना घडल्या आहेत. सकाळी १० ते ११ या वेळेत ११३ घटना घडल्याची नोंद आहे.
• सुरक्षा दलाने केलेल्या अभ्यासानुसार, चोरीच्या घटना दुपारीही घडल्या असून त्याचे प्रमाण मात्र कमी आहे. दुपारी १२ ते १ दरम्यान मोबाइल चोरीचे ११७ गुन्हे घडल्याचे सांगण्यात आले.
• सुमारे ७५ टक्के प्रकरणे (२,३०८ गुन्हे ) लोकलगाडय़ांमध्ये घडली आहेत आणि फक्त २५ टक्के गुन्हे स्थानक परिसरात नोंदवली गेली आहेत.