मुंबई : मध्य रेल्वेच्या शीव रेल्वे स्थानकाजवळ धावत्या लोकलमधून पडून तीन प्रवासी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. तिन्ही प्रवाशांना शीव रुग्णालयात दाखल केले असून दोघांची प्रकृती स्थिर असून एकाची प्रकृती गंभीर आहे.

नुकताच मालाड रेल्वे स्थानकात गर्दीच्या आणि लोकलमधून उतरण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादाचे स्वरुप भांडणात होऊन, एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाचा खून केला. अशाच घटना याआधीही घडल्या आहेत. गर्दीमुळे लोकलमधून पडून तीन प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर खबरदारी म्हणून रेल्वे सेवेची ओएचई बंद केली. ज्यामुळे सुमारे ९ मिनिटे लोकल सेवा विस्कळीत झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवंडी येथील रहिवासी अफझल चौधरी (३६), नालासोपारा येथील रहिवासी सचिन विश्वकर्मा (२१) आणि कुर्ला येथील रहिवासी जैनिल सय्यद (२५) अशी जखमींची नावे आहेत. प्रथमदर्शनी ही घटना लोकलमधील गर्दीमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या जखमी प्रवाशाचे जबाब नोंदवल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्याने दिली.