मुंबई : मोठा गाजावाजा करीत वाहतुकीसाठी खुला झालेला कुलाबा-वांद्रे -सिप्झ मेट्रो – ३ प्रकल्प सुरुवातीपासूनच प्रवाशांसाठी डोकेदुखी बनू लागला आहे. वारंवार विविध कारणांमुळे विस्कळीत होणारी मेट्रो सेवा, पाणीगळती, तांत्रिक बिघाड आदींमुळे प्रवाशांचा खोळंबा होत असतानाच आता मेट्रो स्थानकांतील असुविधांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

त्यामुळे मुंबई मेट्रो रेल कोर्पोरेशनला सातत्याने टीकेला तोंड द्यावे लागत आहे. मेट्रो स्थानकांतील अस्वच्छ शौचालये, तुंबलेले बेसिन, काही स्थानकांत पिण्याच्या पाण्याची बंद असलेली यंत्रे आदींमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. दरम्यान, बहुतांश स्थानकांवरील वातानुकूलन यंत्रणेला गळती लागल्याचेही दिसून आले.

कुलाबा-वांद्रे -सिप्झ मेट्रो – ३ मार्गिकेतील आरे – बीकेसी या १२. किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यात आले. मोठा गाजावाजा करीत पहिल्या टप्प्यातील मेट्रो वाहतूक सुरु झाल्यांनतर प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, या टप्प्यातील वाहतूक सुरु होताच काही दिवसातच निरनिराळ्या समस्यांनी डोके वर काढले आहे. काही दिवसांनी बीकेसी – आचार्य अत्रे चौक, वरळी हा दुसरा टप्पा देखील वाहतूक सेवेत दाखल झाला.

त्यामुळे वाहतुकीवरील ताण कमी होण्याची आशा असतानाच मोसमी पावसाच्या पहिल्या दिवशी आचार्य अत्रे चौक भुयारी मेट्रो स्थानकात पाणी तुंबले. मेट्रो प्रशासनाने तातडीने संबंधित स्थानकांवरील मेट्रो सेवा तात्पुरती स्थगित केल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. पहिल्याच पावसात मेट्रोचा बोजवारा उडल्यामुळे मेट्रो प्रशासनावर टीकेची झोड उठली. त्यांनतर, दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यांनतर पुन्हा मेट्रो सेवा पूर्ववत करण्यात आली. मात्र, पावसापासून स्थानक सुरक्षित ठेवण्यासाठी ते ताडपत्रीने झाकण्याची वेळ आली.

स्थानकांवरील या असुविधांमुळे मेट्रो प्रशासनाच्या नियोजनाबाबत प्रवाशांकडून साशंकता व्यक्त केली आहे. तसेच, या समस्या मार्गी लावून प्रवाशांची गैरसोय टाळावी, अशीही मागणी केली जात आहे.

समस्याग्रस्त स्थानके

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेट्रो ३ चा प्रकल्प सुरु झाल्यापासून प्रवाशांची गैरसोय होण्याची सत्रे सुरूच आहेत. धारावी आणि शितलादेवी मंदिर मेट्रो स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची यंत्रे ठेवण्यात आली आहेत. मात्र, त्याचे नळ कोरडेच आहेत. स्थानकांवरील शौचालये अस्वच्छ असल्यामुळे महिला प्रवाशांची कुचंबणा होत आहे. धारावी मेट्रो स्थानकाच्या महिलांच्या शौचालयातील बेसिन तुंबलेले असल्यामुळे अस्वच्छतेबाबत महिलांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच, संबंधित मेट्रो स्थानकावरील एक स्वयंचलित जिना देखील बंद आहे. बहुतांश स्थानकांवरील एसीला गळती लागली असल्याने त्यातून पाणी टपकत असल्याचेही समोर आले आहे. शिवाय, मेट्रो स्थानकांवर पुरेशी बैठक व्यवस्था नसल्याने प्रवाशांना ताटकळत मेट्रोची वाट पाहावी लागते आहे. निकामी सामानही स्थानकात पडून आहे.