एसटी संपामुळे प्रवासी वेठीस

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाची धार सोमवारी अधिक तीव्र करून कामगारांनी काम पूर्णपणे बंद ठेवल्याने मुंबईसह, ठाणे जिल्ह्यातील एसटी सेवा ठप्प झाली.

कुर्ला एसटी आगारात सोमवारी प्रवासी बसची प्रतीक्षा करत होते. मात्र एकही बस न धावल्याने त्याचा मोठा फटका प्रवाशांना सहन करावा लागला.

मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील सेवा ठप्प; महानगरातील नोकरदार वर्गाला मोठा फटका

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाची धार सोमवारी अधिक तीव्र करून कामगारांनी काम पूर्णपणे बंद ठेवल्याने मुंबईसह, ठाणे जिल्ह्यातील एसटी सेवा ठप्प झाली. ठाणे जिल्ह्यातील सर्वच आगारातील वाहतूक बंद झाल्याने मुंबईच्या दिशेने कामानिमित्त येणाऱ्या नोकरदार वर्गाला खासगी प्रवासी बस आणि अ‍ॅपआधारित टॅक्सी या वाहतुकीवरच अवलंबून राहावे लागले, त्यामुळे त्यांचे दरही वाढले होते.

मुंबई महानगरात परळ, कुर्ला-नेहरूनगर, मुंबई सेन्ट्रल, बोरिवली यांसह ठाणे विभागांतर्गत येणाऱ्या खोपट, वंदना, कल्याण, विठ्ठलवाडी, पनवेल, भिवंडी, पालघर, उरण इत्यादी आगारातून दिवसाला २०० ते २२५ गाडय़ा दररोज चालविल्या जातात. यामध्ये साध्या, निमआराम आणि शिवशाही बस गाडय़ांचा समावेश आहे. त्यांच्या एकूण दीड हजारांपर्यंत फेऱ्या होतात. महानगरात एसटीने दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या ४४ हजार ते ४८ हजारांपर्यंत आहे. भिवंडी ते मुंबई, अलिबाग ते मुंबई, दादर ते पनवेल, मंत्रालय ते पनवेल, दादर ते उरण, ठाणे ते बोरिवली आणि कल्याण ते पनवेल यांसह डोंबिवली, कल्याण, भिवंडी इत्यादी भागातूनही ठाण्यासाठीही एसटी गाडय़ा धावतात.

परंतु सोमवारी सकाळी सातच्याही आधी पनवेल, पालघर, उरण, कल्याण आगाराबरोबरच, ठाण्यातील दोन आगारांसह अन्य काही आगारांतील एसटी सेवा बंद झाल्या. या आगारातून मुंबईसाठी गाडय़ा सुटत नव्हत्या. मात्र मुंबईतील तीनही आगारातून अन्य ठिकाणी जाण्यासाठी सकाळी एसटी सुटत असल्याने काही कामगारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे परळ व कुर्ला नेहरू नगर आगारातून एसटी सुटणे बंद झाले. मुंबई सेन्ट्रल आगारातूनही तुरळक प्रमाणात सेवा सुरू होती.

परिणामी दिवाळी आणि आठवडा अखेरच्या सलग सुट्टय़ांनंतर कामाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी मुंबई महानगरातील नोकरदार वर्गाला या संपाचा फटका बसला. एसटी उपलब्ध नसल्याने अनेकजण आगारातील चौकशी खिडक्यांवर येऊन चौकशी करत होते. लशीची एकच मात्रा घेतलेल्या किंवा लस न घेतलेल्यांना मुंबई महानगरात प्रवास करताना एसटी एक पर्याय ठरते. परंतु तो पर्यायही नसल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला.

खासगी वाहतुकीचा महागडा पर्याय.

खासगी बसगाडय़ांचा आणि अ‍ॅप आधारित टॅक्सी आधार घेताना मात्र खिशाला कात्री लागली. पनवेल ते दादर मार्गासाठी एसटी ६० रुपये मोजत असतानाच खासगी बसने १०० ते दीडशे रुपये तर ठाणे ते बोरिवलीसाठी एसटीसाठी ४५ रुपये, पनवेल ते मंत्रालयसाठी ९० रुपये दर असून खासगी बससाठी दुप्पट पैसे द्यावे लागले.

प्रवासी ताटकळत भाऊबीजेनिमित्त मुंबईत आलेल्या प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागला. मुंबई सेन्ट्रल, परळ, कुर्ला- नेहरूनगर आगारात बसच्या प्रतीक्षेसाठी अनेक प्रवासी अनेक तास ताटकळत होते. पुण्यातील खेडला राहणारे कार्तिक पाटोळे हे त्यांचा लहान भाऊ आणि आईसोबत मुंबईत मामाकडे आले होते. चार दिवसांपूर्वी एसटीच्या परतीच्या प्रवासाचे तिकीट काढले होते आणि त्यासाठी मुंबई सेन्ट्रल येथून सोमवारी एसटी पकडणार होते. एकतरी गाडी सोडतील या आशेने दोन तास मुंबई सेन्ट्रल आगारात बसून असल्याचे कार्तिक पाटोळे यांनी सांगितले. संपामुळे एसटी सोडण्याची चिन्हे नसल्याने तिकिटाचा परतावा घेतला आणि संप मिटत नाही, तोपर्यंत मुंबईत नातेवाईकांकडे आणखी एक दिवस राहण्याचा विचार करत असल्याचेही सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Passengers stranded st strike ysh

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!