चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाचे समन्स, पारपत्र जप्त बांधकाम खात्यातील घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज यांनाही सक्तवसुली संचालनालयाने चौकशीकरिता समन्स बजावले असून, त्यांचे पारपत्र जप्त केले आहे. समीर यांच्यापाठोपाठ पंकज यांच्याविरोधातही कारवाईचा फास आवळला जाण्याची चिन्हे आहेत. बांधकाम खात्यातील घोटाळ्याचा पैसा समीर आणि पंकज यांच्या मालकीच्या कंपनीकडे वळविण्यात आल्याचा आरोप आहे. छगन भुजबळ हे सध्या अमेरिका दौऱ्यावर असून, पंकज हे देशाबाहेर पळून जाऊ नयेत म्हणून त्यांचे पारपत्र सक्तवसुली संचालनालयाने जप्त केले आहे. पंकज यांची येत्या दोन दिवसांत चौकशी होणार असून, त्यात त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्यास त्यांच्याविरुद्धही कारवाई होऊ शकते. अमेरिकी काँग्रेसच्या निमंत्रणावरून छगन भुजबळ सध्या अमेरिकेस गेले आहेत. मायदेशी परतल्यावर त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. भुजबळांच्या विरोधात सुरू झालेली कारवाई ही राजकीय सूडबुद्धीने करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.