मुंबई : राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी दरवर्षी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एससीईआरटी) चाचणीचे (पॅट) आयोजन केले जाते. मात्र या परीक्षेसाठी दरवर्षी एससीईआरटीकडून अपुऱ्या प्रश्नपत्रिका पाठविण्यात येत असल्याने शिक्षक व मुख्याध्यापकांना परीक्षा घेताना तारेवरची कसरत करावी लागते.
यंदाही एससीईआरटीने स्पष्ट आदेश देऊनही शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना पुरेशा प्रश्नपत्रिका दिलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घ्यायचा असा प्रश्न मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.
राज्यातील शाळांमध्ये इयत्ता दुसरी ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन संपादन कितपत साध्य केले आहे याची पडताळणी करणे, अध्यापन प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करणे तसेच विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीचे मूल्यमापन करण्यासाठी दरवर्षी एससीईआरटीकडून पॅट घेण्यात येते.
येत्या ११, १५ आणि २२ एप्रिलरोजी राज्यातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अनुदानित शाळांमध्ये ही चाचणी घेतली जाणार आहे. पॅट परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी एससीईआरटीने परिपत्रकाद्वारे शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना युडायस नोंदीनुसार विद्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणे प्रश्नपत्रिका वितरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पुरवठा करताना अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि अचूक नोंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार ८ एप्रिल रोजी राज्यातील सर्व शाळांना पॅट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मात्र एसईआरटीच्या निर्देशानंतरही मुंबईसह राज्यातील अनेक शाळांना आवश्यकतेपेक्षा कमी प्रश्नपत्रिका मिळाल्याच्या तक्रारी मुख्याध्यापक व शिक्षकांकडून करण्यात आल्या आहेत. प्रश्नपत्रिकांची नक्कलप्रत (झेरॉक्स) काढण्यास एसईआरटीकडून बंदी घातली आहे. त्यामुळे पुरेशा प्रश्नपत्रिका नसताना विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घ्यायचा असा प्रश्न आता शाळा प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
दरम्यान, प्रश्नपत्रिका कमी आल्याची माहिती विभाग निरीक्षकांना दिली असता त्यांच्याकडून ३० सप्टेंबरच्या पटाप्रमाणे प्रश्रपत्रिका देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र ३० सप्टेंबरच्या पटापेक्षाही कमी प्रश्नपत्रिका आल्याचे काही मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. तसेच ३० सप्टेंबरनंतर प्रवेश झालेल्या व स्थलांतरित विद्यार्थांची परीक्षा कशी घ्यायची असा प्रश्नही मुंबईतील एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी उपस्थित केला आहे.
पॅटचीही प्रश्नपत्रिका फुटली
पॅटची प्रश्नपत्रिका फुटू नये यासाठी एससीईआरटीकडून आवश्यक काळजी घेतल्याचा दावा केला जातो. मात्र प्रश्नपत्रिकेचे वितरण झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच इयत्ता सातवीचा मराठी भाषेची प्रश्नपत्रिका यूट्युबवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यूट्युब चॅनेलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या प्रश्नपत्रिकेत सर्व प्रश्नांची उत्तरेही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली आहेत. अवघ्या चार तासांत ही प्रश्नपत्रिका १० हजारांपेक्षा अधिक लोकांनी पाहिली आहे.
