राज्यात पुन्हा रुग्णवाढ

२४ तासांत मुंबईत ५५८, तर अमरावतीत ३५९ करोनाबाधित

(संग्रहित छायाचित्र)

गेले तीन आठवडे राज्यात सरासरी दोन ते अडीच हजार रुग्णांचे प्रतिदिन निदान होत असताना गेल्या २४ तासांत राज्यात ३,४५१ नवे रुग्ण आढळले आहेत. अमरावती शहरात रुग्णांच्या संख्येत चोवीस तासांत ३५९  इतकी मोठी वाढ झाल्याने आरोग्य खात्याची यंत्रणा अधिक  सावध झाली असून मुंबईतही ५५८ नवे बाधित आढळले.

राज्यात गेले काही दिवस करोना रुग्णसंख्या घटली होती. यातूनच सर्वसामान्यांसाठी प्रवास खुला करण्यात आला. बंधने अधिक शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू झाली; परंतु या आठवडय़ात रुग्णसंख्येत वाढ झाल्याने सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली. विदर्भात रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता केंद्रीय आरोग्य पथकाने व्यक्त केली होती. नागपूरमधील रुग्णसंख्या अजूनही कमी झालेली नाही.

मुंबईची स्थिती..

मुंबईत बुधवारी ५५८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून चार रुग्णांचा मृत्यू झाला, तर ४७६ रुग्ण एका दिवसात बरे झाले. दरम्यान, उपचाराधीन रुग्णांची संख्या आज किंचित वाढली असून ती पाच हजार ३६९ वर पोहोचली आहे. गेल्या आठवडय़ातील रुग्णसंख्या पाहता रुग्णवाढीचा दर ०.१३ टक्के  झाला आहे.

दिवसभरात..

मुंबई ५५८, ठाणे ९९, कल्याण-डोंबिवलीमध्ये १०३, नवी मुंबईत ९९, अमरावती शहरात ३५९,  पुण्यात २६४, पिंपरी-चिंचवडमध्ये १३२, उर्वरित पुणे जिल्ह्य़ात १३८ नवे रुग्ण आढळले.

‘ऑक्सफर्ड’च्या लशीची शिफारस

ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेल्या लशीच्या वापराची शिफारस बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञ समितीने केली.

६५ वर्षांवरील व्यक्तींसाठीही ही लस वापरण्याची सूचना समितीने केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Patient growth again in the state abn

ताज्या बातम्या