१०७ रुग्णांची लशीकडे पाठ; जनुकीय अहवालातून निदर्शनास; लस न घेणाऱ्या तिघांचा मृत्यू

कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेतील जनुकीय चाचण्यांमधील २६९ नमुन्यांतील १०७ रुग्णांनी लशीची एकही मात्रा न घेतल्याचे निदर्शनास आले आहे.

nl corona
प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेतील जनुकीय चाचण्यांमधील २६९ नमुन्यांतील १०७ रुग्णांनी लशीची एकही मात्रा न घेतल्याचे निदर्शनास आले आहे. यातील २२ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले असून यातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेने सोमवारी जाहीर केली.

कस्तुरबा प्रयोगशाळेत केलेल्या जनुकीय चाचण्यांच्या अहवालाचे तपशील राज्याच्या आरोग्य विभागाने शनिवारीच जाहीर केले होते. या रुग्णांच्या लसीकरणाचा तपशील पालिकेने सोमवारी जाहीर केला. कस्तुरबा प्रयोगशाळेमध्ये १३ व्या जनुकीय चाचणीमध्ये ३६७ नमुन्यांची चाचणी केली असून यातील २६९ नमुने हे मुंबईतील होते, तर उर्वरित नमुने हे मुंबई महानगर क्षेत्राबाहेरील होते. या जनुकीय अहवालानुसार, ९९ टक्के नमुने ओमायक्रॉनच्या उपप्रकाराने बाधित असल्याचे आढळले आहे. तसेच या नमुन्यांमध्ये बीए.४ चे सहा तर बीए.५ चे १२ रुग्ण आढळले आहेत.

लस न घेतलेल्या रुग्णांना दाखल करण्याची आवश्यकता

बीए.४ च्या ६ रुग्णांपैकी ४ जणांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत, तर उर्वरित दोघांनी एकही मात्रा घेतलेली नाही. या दोन्ही रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले होते. बी ए.५ च्या १२ रुग्णांपैकी ७ जणांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत, तर ५ जणांनी एकही मात्रा घेतलेली नाही. या ५ पैकी एका रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले होते. हे सर्व रुग्ण सध्या बरे झाले असून यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

लस न घेतलेल्या रुग्णांची स्थिती

२६९ नमुन्यांपैकी १०७ रुग्णांनी लशीची एकही मात्रा घेतलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. लस न घेतलेल्यांपैकी २२ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले, तर ५ रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले. एका रुग्णाला वैद्यकीय प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवठा करावा लागला. रुग्णालयात दाखल या २२ पैकी ३ रुग्णांचा मृत्यू झाला. या तीनही रुग्णांना सहव्याधीदेखील होत्या.

लस घेतलेल्यांची स्थिती

आठ रुग्णांनी लशीची केवळ पहिली मात्रा घेतलेली होती आणि यापैकी दोन जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या १५४ रुग्णांपैकी ३१ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी एका रुग्णास अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले.

पालिका, राज्याच्या आकडेवारीमध्ये संभ्रम

राज्याच्या आरोग्य विभागाने शनिवारी जाहीर केलेल्या अहवालामध्ये मुंबईत २३ रुग्णांनी बीए.४ आणि बीए.५ चे २३ रुग्ण आढळल्याचे जाहीर केले होते, परंतु सोमवारी पालिकेने याच अहवालाचा दाखला देत १८ रुग्णांना ओमायक्रॉनच्या उपप्रकारांची बाधा झाल्याचे सांगितले आहे. याबाबत पालिकेकडे वारंवार विचारणा करून ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे नेमके किती रुग्ण आढळले आहेत, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

मुंबईत १,०६२ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : गेल्या २४ तासांत मुंबईतील कमी चाचण्या करण्यात आल्याने दैनंदिन रुग्णसंख्येत सोमवारी काहीशी घट पाहायला मिळाली. मुंबईत सोमवारी १ हजार ६२ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर दुसऱ्या दिवशी पाच करोना रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली.

मुंबईत करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. सोमवारी १,०६२ नवीन रुग्ण आढळले. मात्र यातील ९४ टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात १,३०५ रुग्ण करोनामुक्त झाले. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या वाढल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढू लागली असून सध्या १२,४७९ रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या २४ तासांत ८ हजार ८५४ चाचण्या करण्यात आल्या. करोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ९७ टक्के झाले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Patients vaccine indicated genetic report death vaccinated ysh

Next Story
उच्च न्यायालयाकडून ‘अदानी पोर्ट्स’ला पाच लाखांचा दंड; अपात्र ठरवण्याचा ‘जेएनपीए’चा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी