राज्यामध्ये सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षादरम्यान सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना समन्स बजावले आहेत. उद्या ईडीच्या कार्यलायमध्ये हजर राहण्याचे समन्स संजय राऊत यांना बजावण्यात आले आहेत. पत्राचाळ प्रकरणामध्ये हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळेच आधीच सत्तासंघर्षामुळे अडचणीत आलेल्या शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊतही आता ईडीच्या या समन्समुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. प्रवीण राऊत यांनी ईडीसमोर केलेल्या खुलाश्यांच्या आधारे हे समन्स बजावण्यात आलेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> विश्लेषण : राऊतांच्या संपत्तीवर जप्ती आणणारं १०३९ कोटींचं पत्राचाळ प्रकरण नेमकं काय? कोणी आणि कसा वळवला पैसा?

मुंबईतील १ हजार ३९ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. याचसंदर्भातील चौकशीसाठी राऊत यांना ईडीने समन्स पाठवले आहेत. उद्या म्हणजेच २८ जून रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये राऊत यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ईडीने आधीच जप्त केलेत ९ प्लॅट
याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये ईडीने या प्रकरणात संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीने केली होती. ईडीने यापूर्वी ११ कोटी १५ लाख ५६ हजार ५७३ रुपयांची स्थावर मालमत्ता या प्रकरणामध्ये अटॅच केली आहे. मनी लॉण्ड्रींग कायदा २०२२ अंतर्गत गोरेगावमधील पत्रावाला चाळ पुर्निविकास प्रकल्पामध्ये ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’ने केलेल्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली. ही संपत्ती ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’चे माजी निर्देशक प्रवीण राऊत यांच्या मालकीची पालघर, सफाळे, पडघा येथील जमीनींबरोबरच दादरमधील वर्षा राऊत यांचा फ्लॅट आणि अलिबामधील किहिम समुद्रकिनाऱ्यावरील वर्षा राऊत ज्या संजय राऊत यांच्या पत्नी आहेत तसेच स्वप्ना पाटकर ज्या सुजित पाटकर यांच्या पत्नी आहेत, या दोघींची एकत्रित मालकी असणाऱ्या जमीनीचा समावेश आहे.

नेमकं प्रकरण काय?
म्हाडाच्या तक्रारीवरून २०१८ मध्ये एचडीआयएलशी संबंधित गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे तत्कालीन संचालक राकेश वाधवान,सारंग वाधवान व इतर आरोपींविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या कंपनीने २००६ मध्ये पत्रा चाळीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला होता परंतु दिलेल्या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. ६७२ रहिवाशांना वाऱ्यावर सोडून विकसकाने म्हाडासाठीचे अतिरिक्त गाळेही दिले नाहीत. या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचे २०११ मध्ये उघड होताच म्हाडाने त्यावर कारवाई सुरू केली. म्हाडाच्या तक्रारीनंतर याप्रकरणी भादंवि कलम १२० (ब), ४०९, ४२० अंतर्गत मार्च २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांच्या आधारावर ईडीनेही गुन्हा दाखल केला होता.

मेसर्स गुरू आशिष कन्स्ट्रक्शनवर ६७२ भाडेकरूंच्या पुनर्वसनासाठी पत्रा चाळ प्रकल्पाच्या विकासाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. संबंधित काळात राकेश कुमार वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत हे मेसर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक होते. सोसायटी, म्हाडा आणि मेसर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आला होता. ६७२ भाडेकरूंना सदनिका देण्यात येईल आणि म्हाडासाठी विकास काम करण्यात येईल आणि त्यानंतर उर्वरित क्षेत्र विकसक विकेल, असे करारात नमुद करण्यात आले होते. मेसर्स गुरू आशिष कन्स्ट्रक्शन्सच्या संचालकांनी म्हाडाची दिशाभूल करून ९ विकासकांना एफएसआय विकून सुमारे ९०१ कोटी ७९ लाख रुपये रक्कम वसूल केली. यावेळी ६७२ भाडेकरू आणि म्हाडा यांना करारानुसार सदनिका देण्यात आल्या नाहीत.

पुढे मेसर्स गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडने मीडोज नावाचा एक प्रकल्प सुरू केला आणि सदनिका विक्रीच्या नावाखाली सुमारे १३८ कोटी रुपये स्वीकारले. मेसर्स गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांनी बेकायदेशीर कृत्यांमधून एकूण १०३९ कोटी ७९ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ईडीला संशय आहे. ईडीेने आतापर्यंत गैरव्यवहाराच्या रकमेचा माग काढला असता एचडीआयएलकडून प्रवीण राऊतच्या खात्यात सुमारे १०० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. ही रक्कम पुढे प्रवीण राऊत यांनी त्यांचे जवळचे सहकारी, कुटुंबातील सदस्य, त्यांच्या व्यावसायिक संस्था इत्यादींच्या विविध खात्यांमध्ये वळती केली. २०१० मध्ये गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेपैकी ८३ लाख रुपये प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी प्रवीण राऊत यांच्याकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे खासदार संजय राऊत यांची पत्नी पत्नी वर्षा राऊत यांना मिळाल्याचेही उघड झाले आहे. ही रक्कम वर्षा राऊत यांनी दादर येथे सदनिका खरेदीसाठी वापरली, असा आरोप आहे.

दिल्ली प्रकरणामध्येही चौकशीची शक्यता…
उत्तर भारतामधील एका २००० हजार कोटींच्या बँक घोटाळ्यात प्रवीण राऊत यांचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणामध्येही दिल्ली ईडीची टीम राऊत यांची चौकशी करु शकते असं एबीपीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. यासंदर्भातील माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली असली तरी सध्या पाठवण्यात आलेली नोटीस ही पत्राचाळ प्रकरणातील आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patra chawl case sanjay raut has been summoned by the ed scsg
First published on: 27-06-2022 at 12:51 IST